हिमालय पूल दुर्घटनेला वर्ष संपत आल्यानंतरही अंमलबजावणी नाहीच
इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता
कमला मिल आग, हिमालय पूल यांसारख्या जीवघेण्या दुर्घटनांनंतर व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने त्या त्या वेळी अनेक घोषणा केल्या. पुलांचे, हॉटेल, इमारतींचे ‘ऑडिट’ करू, पूल प्राधिकरण स्थापन करू, अग्निशमन दलाच्या कामात सुसूत्रता आणू, अशा अनेक घोषणा केल्या. प्रत्येक घोषणेनंतर सर्वसामान्य नागरिकाच्या मनात व्यवस्थेत सुधारणा होण्याची आशा पल्लवित होते. मात्र, प्रत्यक्षात या घोषणांचे पुढे काय होते, हे समोरच येत नाही. अशाच घोषणांचा पंचनामा करणारी ही वृत्तमालिका..
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकालगतचा हिमालय पूल कोसळल्याच्या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले तरी पुलांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा प्रत्यक्षात आलेली नाही. महिनाभरात हे प्राधिकरण स्थापन करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले होते. मात्र पूल विभागात अभियंत्यांची संख्या कमी असल्यामुळे हे प्राधिकरण अस्तित्वातच येऊ शकले नाही.
गेल्या वर्षी १४ मार्च २०१९ रोजी संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हिमालय पुलाचा भाग भर रस्त्यात कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचे बळी गेले तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशांनुसार पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी करून २४ तासांमध्ये प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्यांना दिले होते. दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्यांनी २४ तासांत या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आयुक्तांकडे सादर केला. त्यात शहरातील पुलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची शिफारसही करण्यात आली. महिनाभरात या प्राधिकरणाची स्थापना करण्याचे जाहीर करण्यात आले होते. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले तरी हे प्राधिकरण अद्याप स्थापन झाले नाही. तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्राधिकरणाच्या प्रमुखपदी पूल विभागाचे उपप्रमुख अभियंता एस. जी. ठोसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्याप या प्राधिकरणाची रचनाच निश्चित झालेली नाही. तर पालिकेचे अधिकारी आता या प्राधिकरणाचे नावही काढत नाहीत.
अंधेरीतील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील सर्वच पुलांचे सर्वेक्षण खासगी कंत्राटदारांमार्फत करवून घेतले. मात्र त्या कंत्राटदारांना हिमालय पुलाबाबत योग्य भाकीत करताच आले नाही. पुलांच्या या तपासणीवर लक्ष ठेवले नाही असा ठपका ठेवून तीन अभियंत्यांना अटक करण्यात आली होती. मात्र अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे अभियंत्यांवरील ताण जास्त असल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे. यापुढेही पुलांच्या नियमित तपासणीसाठी प्रभावी यंत्रणेची गरज आहे. मात्र अद्याप तरी पालिकेकडे पूल विभागात असलेल्या तोकडय़ा मनुष्यबळावरच सगळी भिस्त आहे.
३७४ पुलांची देखभाल,दुरुस्तीची जबाबदारी
मुंबईतील एकूण ३७४ पुलांची देखभाल पालिकेतर्फे केली जाते. त्यात उड्डाणपूल, पादचारी पूल, भुयारी मार्ग, आकाश मार्गिका (स्काय वॉक) यांचा समावेश आहे. तसेच एमएमआरडीएने हस्तांतरित केलेल्या पुलांचाही समावेश आहे. या पुलांच्या नियमित देखभालीसाठी पालिकेच्या अखत्यारीत स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे आणि या प्राधिकरणावर प्रमुख पूल निरीक्षकांची नियुक्ती करावी, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती.
रिक्त पदांमुळे रखडपट्टी
पालिकेतील अभियंत्यांची तब्बल ३० टक्के पदे आधीच रिक्त आहेत. त्यातच पूल विभागात आधीच मोठय़ा प्रमाणावर रिक्त पदे आहेत. त्यामुळे प्राधिकरणासाठी पुरेसे मनुष्यबळच पूल विभागात नसल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पूल विभागात सध्या सुमारे ५० सब इंजिनीअर आहे, तर पाच ते सहा साहाय्यक अभियंते आहेत. ४ कार्यकारी अभियंते आहेत. दोन उपप्रमुख अभियंते आहेत. सध्या पूल विभागाच्या प्रमुख अभियंतापदाचा भारही प्रभारी दिलेला आहे.
गेल्या चार वर्षांतील मोठय़ा पूलदुर्घटना
* ३ जून २०१८ – अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाचा भाग कोसळून एक ठार, चार जखमी.
* १५ ऑक्टोबर २०१७ – चर्नीरोड स्थानकाजवळील पादचारी पुलाचा जिना कोसळून एक जखमी.
* १३ डिसेंबर २०१५ – मालाड ते मालवणीदरम्यानचा एव्हरशाइन नगर येथील पूल कोसळून ९ जखमी.