मुंबई: मुंबईतील हवेतील वाढते प्रदुषण, धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केल्यानंतर महिन्याभराने त्याच्या अंमलबजावणीसाठी मुहूर्त सापडला आहे. प्रदुषण निर्माण करणाऱ्या घटकांवर देखरेख ठेवण्यासाठी विभाग कार्यालयांच्या स्तरावर कृती दल (टास्क फोर्स) नेमण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक विभागामध्ये तीन विषयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन कृती दल कार्यरत राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिसेंबरपासून मुंबईमधील हवेतील प्रदुषण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी १२ मार्च रोजी सात सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने मार्च अखेरीस आपला अहवाल मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे सादर केला होता. या अहवालात प्रदुषणाबाबत तातडीने आणि दूरगामी उपाययोजना करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हेही वाचा… “बारसू सर्व्हेक्षण रद्द करा”, अजित पवारांच्या मागणीवर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले…

तसेच धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित विभागांनी पथकांमार्फत धूळ निर्माण करणाऱ्या घटकांवर व क्षेत्रांवर लक्ष ठेवावे, असे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. तसेच १ एप्रिलपासून या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. मात्र विभाग स्तरावर अशी पथके स्थापन करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रदुषण रोखण्याबाबत महानगरपालिका गंभीर नसल्याचा आरोप सर्व स्तरातून होऊ लागला होता. त्यानंतर आता महानगरपालिकेने काही विभागांमध्ये कृती दलाची नेमणूक करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा… मुंबई: वाढत्या उकाड्यामुळे त्वचा रोगांची धास्ती; रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ; काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

इमारत बांधकामे

इमारत बांधकामाच्या ठिकाणी हवेत उडणाऱ्या धुलिकणांच्या नियंत्रणासाठी एक पथक काम करणार आहे. मुंबईत सुरू असलेल्या रस्ते आणि पूल बांधणीच्या कामाच्या ठिकाणी तीन सदस्यांचे पथक प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून, प्रकल्पस्थळी नियमितपणे धूळ नियंत्रणाची खबरदारी घेण्यात येत आहे की नाही, याची पडताळणी करणार आहे. त्यासोबतच मुंबई महानगरपालिका आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचाही यामध्ये समावेश असणार आहे.

रस्त्यांची झाडलोट आणि स्वच्छता

मुंबईतील रस्त्यांची दैनंदिन झाडलोट व स्वच्छता करताना उडणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आणि पाण्याची फवारणी (स्प्रिंकलिंग) करणे, रस्ते स्वच्छतेच्या विशेष मोहिमा आदींबाबींवर कृती दल देखरेख ठेवणार आहे. उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा व इतर टाकाऊ वस्तू / पदार्थांची ठिकाणे आदींचाही कृती दल शोध घेणार आहे.

अस्वच्छ इंधनाचा वापर

मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबा, बेकरी, उपहारगृहे, रस्त्यांवरील स्टॉल आदी ठिकाणी कोणत्या प्रकारचे इंधन वापरण्यात येते, याचीही पाहणी करण्यात येणार आहे.

कृती दलाच्या सदस्यांना विभागीय पातळीवर प्रत्यक्ष भेटीद्वारे निरीक्षणे नोंदवून अहवाल तयार करावा लागणार आहे. हा अहवाल दर आठवड्याला विभागीय सहायक आयुक्तांना सादर करावा लागणार आहे. धूळ नियंत्रण, पर्यावरणाशी संबंधित बाबींची अंमलबजावणी न करणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी समज देणारी नोटीस पहिल्यांदा बजावण्यात येईल. पहिल्या नोटीशीनंतरही नियमांची अंमलबजावणी न केल्यास संबंधित प्रकल्पांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. उपाययोजनांचे उल्लंघन होत असलेल्या ठिकाणचे कंत्राटदार किंवा जबाबदार संस्थेवर संबंधित विभागांमार्फत दंडात्मक कारवाई करून घेण्याची कार्यवाही कृती दलाला पार पाडावी लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brihanmumbai municipal corporation has established task force to reduce the increasing air pollution and dust in mumbai mumbai print news dvr
Show comments