महापालिकेच्या सुधार समितीच्या मागील बैठकीत वाहनतळांवरील शुल्कवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, त्याला सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता. मात्र, गुरुवारी सत्ताधारी व विरोधकांचा शुल्कवाढविरोध अचानक मावळल्याने आता शहरातील वाहनतळ शुल्कात वाढ करण्यात येणार आहे.
सुधार समितीने वाहनतळांची तीन श्रेणींमध्ये वर्गवारी केली होती. ‘अ’ श्रेणीमध्ये महत्त्वाची व्यापारी संकुले, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालयांच्या परिसरातील वाहनतळांचा समावेश आहे. तर ‘ब’मध्ये महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांच्या वाहनतळांचा समावेश आहे. ‘क’मध्ये पदपथालगतच्या वाहनतळांचा समावेश करण्यात आला आहे.
‘अ’साठी चौपट, ‘ब’साठी तिप्पट, तर ‘क’साठी प्रत्येक टप्प्यात पाच रुपयांची वाढ सुचविणाऱ्या प्रस्तावाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे हा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठविण्यात आला होता.
सुधार समिती सदस्यांची एकी
सुधार समिती सदस्यांनी एकीचे दर्शन दाखवित प्रस्ताव फेटाळल्यामुळे महापौर सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी विरोध केला असतानाही महापौरांनी शुल्कवाढीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला.
प्रशासनाने गुरुवारी पुन्हा सुधार समितीच्या बैठकीत कोणतेही फेरबदल न करता हा प्रस्ताव सादर केला होता. महापौरांनी हिरवा कंदील दाखविल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना गुरुवारच्या बैठकीत मूग गिळून हा प्रस्ताव मंजूर करावा लागला.
गटनेत्यांनी हा प्रस्ताव लादला असून त्यामुळे वैधानिक समितीच्या सदस्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचा आरोप करत सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध करीत विरोधकांनी सभात्याग केला.
‘अ’ श्रेणी (एक तासाचे शुल्क)
दुचाकी – दोन रुपयांवरून १५ रुपये
चार चाकी – १५ रुपयांवरून ६० रुपये
टॅक्सी-रिक्षा – १५ रुपयांवरून ३० रुपये
ट्रक – २५ रुपयांवरून ९० रुपये
सार्वजनिक बस – २५ रुपयांवरून ६५ रुपये
‘ब’ श्रेणी (एक तासाचे शुल्क)
दुचाकी – दोन रुपयांवरून १० रुपये
चार चाकी – १५ रुपयांवरून ४० रुपये
टॅक्सी/रिक्षा – १५ रुपयांवरून २० रुपये
ट्रक – २५ रुपयांवरून ६० रुपये
सार्वजनिक बस – २५ रुपयांवरून ४५ रुपये
‘क’ श्रेणी (एक तासाचे शुल्क)
दुचाकी – दोन रुपयांवरून पाच रुपये
चार चाकी – १५ रुपयांवरून २० रुपये
टॅक्सी/रिक्षा – १५ रुपयांवरून १० रुपये
ट्रक – २५ रुपयांवरून ३० रुपये
सार्वजनिक बस – २५ रुपये (पूर्वीइतकाच)