मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपल्या रुग्णालयांसाठी लागणारी औषधे, उपकरणे, साहित्य खरेदी करण्याची जबाबदारी मध्यवर्ती खरेदी खात्यावर सोपविली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मध्यवर्ती खरेदी खात्यामध्येच सावळा गोंधळ सुरू असून त्यामुळे रुग्णालयांना वेळेवर, पुरेशी औषधे उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. परिणामी, रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे. रुग्णांना औषधे देता यावीत यासाठी रुग्णालये स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करीत आहेत. मात्र मध्यवर्ती खरेदी खात्याने निश्चित केलेल्या दराच्या तीन ते पाचपट अधिक दराने रुग्णालयांना या औषधांची खरेदी करावी लागत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शनिवारी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सर्व वितरकांसोबत बैठक घेतली होती. यावेळी शिंदे यांनी सर्व वितरकांना २०१९-२० च्या दर करारानुसार पुढील तीन ते चार महिने औषधांचा पुरवठा करण्याची विनंती केली. सध्या रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान लागणाऱ्या साहित्याचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेऊन डॉ. शिंदे यांनी वितरकांना अनुसूची ११ मधील १७ साहित्य २०१९-२० च्या दर करारानुसार पुरविण्याची विनंती केली आहे. २०१९-२० चा दर करार हा डिसेंबर २०२२ मध्ये संपुष्टात आला आहे. असे असतानाही अद्याप मध्यवर्ती खरेदी खात्याकडून नवीन दर करार निश्चित करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णालयांना स्थानिक पातळीवरून औषधे खरेदी करावी लागत आहेत. या औषधांची खरेदी निश्चित केलेल्या दर कराराच्या किमतीपेक्षा तीन ते पाच पट अधिक दराने करण्यात येत आहे. यामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.
हेही वाचा : “जनतेसाठी नाही तर आपली दुकानं बंद होतील ती वाचवीत म्हणून ‘इंडिया’तले पक्ष…”, देवेंद्र फडणवीसांची टीका
आवश्यक साहित्याचाच पुरवठा होत नसल्याने नाईलाजास्तव ते बाहेरून आणण्याची सूचना डॉक्टरांना रुग्णांना करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तसेच रुग्णालये रुग्णांसाठी काही औषधे व साहित्य स्थानिक पातळीवरून खरेदी करीत आहेत. आंतररुग्ण विभागात दाखल होणाऱ्या बहुतांश रुग्णांसाठी आयव्ही संच वापरण्यात येते. मध्यवर्ती खरेदी कक्षाने या संचाची दर करारानुसार ५.८९ रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे. मात्र स्थानिक पातळीवर रुग्णालये १५.५८ रुपयांना आयव्ही संच खरेदी करीत आहे. त्याचप्रमाणे युरिन बॅग १५.३५ रुपयांऐवजी ५३.०२ रुपयांना खरेदी करावे लागत आहे.
हेही वाचा : ६३ कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक
रुग्णालयांना इन्फंट फिडिंग ट्युब ३.८८ रुपयांऐवजी ३९.२० रुपयांना, पीव्हीसी इंडो ट्रॅचेल ट्यूब प्लेन १९.८५ रुपयांऐवजी १५६.८० रुपयांना, ब्लड ट्रान्स्फ्यूजन सेट ७.८८ रुपयांऐवजी २३.५२ रुपयांना, एअरवेज प्लास्टिक १४.०८ रुपयांऐवजी ४९.२८ रुपयांना, सक्शन कॅथेटर डिस्पोजल ४ रुपयांऐवजी १९.८८ रुपयांना, कॉर्ड क्लॅम्प १.४८ रुपयांऐवजी ९.५२ रुपयांना खरेदी करावी लागत आहे. मध्यवर्ती खरेदी खात्यातील अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे नागरिकांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनालाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.