मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठय़ा प्रमाणात अस्वस्थता असून त्याचा फायदा उठविण्यासाठी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणण्याच्या कामाला लागा, असा आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी कार्यकर्त्यांना दिला.

मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी चांगले वातावरण, सक्षम नेतृत्व, केंद्रात आणि राज्यात निर्णय घेणारे सरकार अशा सगळय़ा जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे पालिकेतील सत्ता नव्या विक्रमाची नोंद करीत भाजपच जिंकेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. त्या वेळी बावनकुळे बोलत होते.

‘मोदी मुंबईतही भारी’
गृहमंत्री अमित शहा यांनी बाळासाहेबांची शिवसेनासह एनडीएचे १५० नगरसेवक मुंबई महापालिकेत विजयी होतील आणि भाजपचाच महापौर होईल असा जो संकल्प सोडला आहे, तो आपल्या सर्वाना पूर्ण करायचा आहे, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार म्हणाले.मुंबईमध्ये सुद्धा एक मोदी सगळय़ांना भारी पडतील असा विश्वास व्यक्त करीत शेलार यांनी भाजप कार्यकर्त्यांना सौजन्य, सहनशक्ती आणि सेवाकार्य वाढविण्याचे आदेश दिले. भाजपशी गद्दारी केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे ना नेतृत्व आहे, ना मतदार आहेत, ना आमदार आहेत. त्यामुळे मतांसाठी दारोदारी त्यांना फिरावे लागत असल्याची टीकाही शेलार यांनी केली.

Story img Loader