स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील पहिली रेल्वे मुंबईत ब्रिटिश कंपन्यांनी सुरू केली. आता मुंबई आणि लगतच्या महानगर प्रदेशात प्रस्तावित असलेल्या १५० किलोमीटर लांबीच्या मेट्रो रेल्वेच्या उभारणीत आणि प्रामुख्याने भूमिगत मेट्रो रेल्वेच्या कामात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ब्रिटनचे साहाय्य मिळणार आहे.
‘एमएमआरडीए’ आणि ब्रिटिश कंपनीत यांच्यात सोमवारी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि अत्याधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो रेल्वे प्रकल्पांची योजना हाती घेतली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत एकूण १४६ किलोमीटर लांबीचे नऊ मेट्रो रेल्वे मार्ग प्रस्तावित आहेत. यात कुलाबा-सीप्झ या ३३ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासह एकूण तीन भुयारी मेट्रो रेल्वे मार्गाचा समावेश आहे.
मुंबईत सध्या वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर पहिला मेट्रो रेल्वे मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. हा मेट्रो रेल्वे मार्ग उन्नत मार्ग (उड्डाणपुलासारखा उंचावरून जाणारा) आहे. भुयारी मेट्रो रेल्वे उभारण्याचा अनुभव प्राधिकरणाकडे नाही. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये भुयारी मेट्रो रेल्वे बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ या प्रसिद्ध कंपनीतर्फे ही भुयारी मेट्रो रेल्वे चालवली जाते. त्यांना १५० वर्षांचा अनुभव असून याच अनुभवाचा लाभ मुंबईतील भुयारी मेट्रो रेल्वे आणि इतर मेट्रो रेल्वेच्या कामात व्हावा यासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ यांच्यात सामंजस्य करार झाला. प्राधिकरणातर्फे महानगर आयुक्त राहुल अस्थाना आणि ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’चे संचालक डेव्हीड वॅबोसो यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ब्रिटनचे मंत्री ग्रेगरी बार्कर, राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया आदी उपस्थित होते. पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच आरोग्य, शिक्षण, वित्तीय सेवा क्षेत्र, किरकोळ व्यापार आदी क्षेत्रांत ब्रिटिश कंपन्यांना राज्यात मोठा वाव असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.
सामंजस्य कराराचे लाभ
* भुयारी मेट्रो रेल्वेचे बांधकाम व त्यातही दाट लोकवस्तीच्या भागात मेट्रोच्या स्थानकाची उभारणी हे काम खूपच अवघड असते. ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ला या कामाचा दांडगा अनुभव आहे. व्हिक्टोरिया, टॉटनहॅम कोर्ट रोड अशी दाट लोकवस्तीच्या भागातील भुयारी मेट्रोची स्थानके त्यांनी उभारली आहेत.
* मेट्रो रेल्वेच्या गाडय़ा, उपकरणे तयार करणारे, पुरवणारे आंतरराष्ट्रीय पुरवठादार आहेत. सामंजस्य करारामुळे दोघांना सा मायिकपणे खरेदी करता येईल व त्यामुळे खरेदी खर्चात बचत होईल.
* मेट्रो रेल्वे चालवण्यासाठीच्या संस्थेची रचना कशी असावी, नियोजन कसे असावे, याचे धडे प्राधिकरणाला मिळतील.
* मेट्रो रेल्वेचे संचालन सुरळीतपणे कसे करावे यासाठी तज्ज्ञ, कर्मचाऱ्यांचे आदान-प्रदान प्रशिक्षण यातून मार्गदर्शन मिळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा