प्राचीन भारतीय वैद्यक, आयुर्वेद ही खरेतर भारताची ओळख, पण आपला हा सांस्कृतिक वारसा जपण्यात आपण नेहमीच उदासीन राहिलो आहोत. हळदीच्या औषधी उपचारांचे पेटंट परदेशी कंपन्या पळवितात तेव्हा आपल्याला जाग येते. मग आपली ‘हळदीघाटा’ची लढाई सुरू होते. या लढाईपासूनही आपण धडा तो घेतलेला नाहीच. आताही आपल्या या वारशाची ओळख करून देण्याकरिता परंपरांचे महत्त्व जाणणारे ब्रिटिश पुढे सरसावले आहेत. इथल्या ‘वेलकम ट्रस्ट’ने आयुर्वेदाशी संबंधित विविध प्राचीन हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे, कपडे, दुर्मीळ छायाचित्रे तसेच उपचारांची साधने, प्राचीन घरघुती वापरातील वस्तू, अनेक भारतीय खेळांचे नमुने भारतभर फिरून गोळा केले. या ट्रस्टने ‘ब्रिटिश कौन्सिल’च्या मदतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त भरविलेले ‘तबियत’ हे अनोखे प्रदर्शन मुंबईकरांकरिता खुले करण्यात आले आहे.
भारतीय औषधे व उपचारपद्धतींची ओळख करून देणारे हे प्रदर्शन २८ मार्चपर्यंत संग्रहालयात मांडण्यात येणार आहे. वेलकम ट्रस्टच्या ‘मेडिसीन कॉर्नर’ या प्रकल्पाचा भाग असलेल्या या प्रदर्शनात विविध प्राचीन हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे, कपडे, दुर्मीळ छायाचित्रे तसेच उपचारांची साधने, प्राचीन घरघुती वापरातील वस्तू, अनेक भारतीय खेळांचे नमुनेही पाहायला मिळणार आहेत. यात भारतातील प्राचीन उपचार पद्धतीबरोबरच भारतीयांची जीवनशैली व कुटुंब व्यवस्थेतून होणारे मूल्यांचे व व्यवहारज्ञानाचे संक्रमण, भारतीयांचे मानवी शरीराबद्दलचे प्राचीन काळापासूनचे ज्ञान व आरोग्याच्या क्षेत्रातील उत्सुकता यांचा विस्तीर्ण पटच या निमित्ताने उलगडला आहे. इंग्लंडमधील संग्राहकांकडे असणाऱ्या भारतासंदर्भातल्या अनेक दुर्मीळ वस्तू पहिल्यांदाच मांडण्यात आल्या आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही आपल्या जीवनशैलीने व उपचारपद्धतींनी भारतातील सामान्य माणूस आरोग्याची काळजी कशी घेतो हे कलात्मकरीत्या दाखवण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात येणार आहे, असे प्रदर्शनाचे प्रमुख रतन वासवानी यांनी सांगितले. वेलकम ट्रस्टच्या संग्रहातील या वस्तू जगातील एक महत्त्वाचा ठेवा असून, त्यातून भारतीय संस्कृतीचे समग्र दर्शन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय देशी-विदेशी चहांच्या विविध प्रकारांची चवही येथे घ्यायला मिळणार आहे. उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांब या खेळाचे सादरीकरण व त्यातून आरोग्याला होणारे फायदे याबाबतचे चर्चासत्र तसेच आवाजाची जोपासना करण्यासाठी भारतीय संगीताचा कसा उपयोग केला जातो, याचे सादरीकरणही यावेळी करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी- ९८९९५९८५८६
आयुर्वेदिक माणूस
प्रदर्शनात अठराव्या शतकात रेखाटण्यात आलेले ‘आयुर्वेदिक माणूस’ हे मानवी शरीराची अंतर्गत रचना दाखवणारे चित्र, अल्कोहोलचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामाचा इशारा देणारे दुर्मीळ चित्र तसेच हंसस्वरूप महाराजांनी १९०३ मध्ये रेखाटलेली मानवी अवयवांची चित्रेही येथे पाहायला मिळणार आहेत.