मुंबई: चंद्रयान ३ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) प्रकाशित केलेल्या पुस्तिकांमध्ये समाविष्ट केलेल्या पुराणातील वानग्या वादग्रस्त ठरल्यावर या पुस्तिका परिषदेच्या संकेतस्थळावरून हटवण्यात आल्या आहेत.चंद्रयान ३ मोहिमेचे यश शाळा-महाविद्यालयांतून साजरे करण्यासाठी आणि चंद्रयान मोहिम कशी यशस्वी झाली याची माहिती देण्यासाठी एनसीईआरटीने अवांतर वाचनासाठी पुस्तिका प्रकाशित केल्या.
त्याचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. त्या पुस्तिका परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्धही करून देण्यात आल्या. या पुस्तिकांमध्ये वैदिक काळापासून भारतात विमाने, उडणारी वाहने यांचा शोध लागला होता. देव-देवता रथ वापरत होते आणि ते रथ उडू शकत होते. त्यांचा वापर देव पृथ्वी, स्वर्ग, अंतराळात फिरण्यासाठी करत असत. विश्वकर्माने ते सूर्याच्या धुळीकणांपासून तयार केलेले पुष्पक विमान रावणाचे वाहन होते, अशा आशयाचे उल्लेख करण्यात आले होते. या उल्लेखांवरून चंद्रयान मोहिमेची माहिती देणाऱ्या पुस्तिकांवरून वाद उद्भवल्यानंतर परिषदेने सोमवारी त्या संकेतस्थळावरून काढून टाकल्या आहेत.