मुंबईमधील नाल्यांची सरासरी ९४ टक्के, तर मिठी नदीची ८३ टक्के सफाई केल्याचा महापालिकेचा दावा पहिल्याच पावसाने फोल ठरविला. पर्जन्य जलवाहिन्या आणि नाल्यांमधील कचऱ्यामुळे सखल भाग जलमय झाले आणि त्याचा फटका वाहतुकीला बसला. परिणामी काही रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली.
मुंबईमधील लहानमोठय़ा नाल्यांमधील सुमारे ३,३५,७५० घनमीटर, मिठी नदीतून १,०८७५० घनमीटर गाळ काढण्यात आला असून नालेसफाईचे सुमारे ९४.३२ टक्के, तर मिठी नदीची ८३.७३ टक्के सफाई पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
पावसाच्या पहिल्याच दणक्यात पालिकेने जाहीर केलेल्या सखल भागांमध्ये पाणी साचले होते. परिणामी गिरगाव, परळ, दादर, प्रभादेवी, कुर्ला, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, विलेपार्ले मालाड, कांदिवली आदी ठिकाणी सखल भाग जलमय झाले होते.
काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या. मुसळधार पावसाच्या तडाख्याने दादरमधील हिंदमाता आणि मालाड सबवे येथे मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. परिणामी हिंदमाता येथील वाहतूक सकाळी पावणेसहा ते ११, तर मालाड सबवे येथील वाहतूक दुपारी २ नंतर अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. तसेच पूर्व उपनगरांमधील काही रस्ते जलमय झाल्याचे चित्र दिसत होते, तर रेल्वे मार्गालगतच्या गटारांची साफसफाई योग्य पद्धतीने न झाल्यामुळे पहिल्याच पावसात रेल्वेचे वेळापत्रकही बिघडले.
दरम्यान, झोपडपट्टय़ांमधील नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा भिरकविण्याचे थांबविलेले नाही. त्यामुळे सफाई केल्यानंतरही नाल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कचरा आला आहे. काही ठिकाणच्या नाले आणि गटारांमध्ये कचरा तरंगत असून तो नाल्यांमध्ये अडकला. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, असे महापालिकेचे संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brook cleaning work fail of municipal and railway
Show comments