मुंबई : दोन दिवसांपूर्वी गोरेगावमधील एका गृहसंकुलात तपकिरी बाज घुबडाचे दर्शन झाले. प्रामुख्याने ही प्रजात आरे, तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात आढळते.

वन्यजीवप्रेमी आणि निसर्गतज्ज्ञ महेश यादव यांना २५ मार्च रोजी गोरेगावमधील (पूर्व) गोकुळधाम येथील गृह संकुलातील एका रहिवाशाने संपर्क साधला. या रहिवाशाने रात्री संकुलात एका पक्ष्याचा विशिष्ट आवाज ऐकला. हा आवाज ऐकून त्यांनी यादव यांना तातडीने बोलावून घेतले. यादव या परिसरातील पक्षी जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करीत आहेत. काही वेळातच महेश यादव संकुलात पोहोचले त्यांनी आवाज ऐकताच तो तपकिरी बाज घुबड (ब्राऊन हॉक-आउल ) असल्याचे नमुद केले. संकुलातील एका झाडावर घुबड बसले होते. हा आवाज घुबडाचाच असल्याचे यादव यांनी सांगितले. दरम्यान, ही प्रजाती आरे जंगलात आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळते. परंतु गृहनिर्माण संकुलात ती दिसणे माझ्यासाठी नवीन होते, असे यादव यांनी सांगितले. आरे जंगल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात समृद्ध जैवविविधता आहे आणि या महत्त्वाच्या अधिवासांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले. याचबरोबर ही प्रजात संकुलात दिसणे ही आश्चर्याची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

तपकिरी बाज घुबड हा मध्यम आकाराचा असून त्याची लांबी ३२ सेमी (१३ इंच) आहे. त्याची लांब शेपटी आणि चेहऱ्यावर वेगळी डिस्क नसल्यामुळे त्याचा आकार बाजासारखा दिसतो . वरचा भाग गडद तपकिरी रंगाचा असतो, शेपटी आडवी असते. खालचा भाग पांढरा असतो आणि लालसर तपकिरी रेषा असतात. अंदमान बेटांवर आढळणाऱ्या उपप्रजातींमध्ये खालचा भाग गडद तपकिरी असतो. डोळे मोठे आणि पिवळे असतात. ते प्रामुख्याने मोठे कीटक, बेडूक, सरडे, लहान पक्षी आणि उंदीर खातात.

कर्कश आवाज

तपकिरी बाज घुबड मादीची हाक ही ओ-यूके …ओओ-यूके… अशी कर्कश असते. हा आवाज घुबड संध्याकाळी आणि पहाटे काढतो. मात्र, नराचा आवाज हा संगीतमय असतो. जो हू…हो, हो, हू-हू-हू-हू… असा असतो.

अधिवास

तपकिरी बाज घुबड प्रामुख्याने मध्य पूर्व ते दक्षिण चीनपर्यंतच्या उष्णकटिबंधीय दक्षिण आशियातील बहुतांश भागात आढळतो. त्याचा अधिवास जंगली प्रदेश असतो. मादी झाडाच्या ढोलीत तीन ते पाच अंडी घालते.

तपकिरी बाज घुबडच्या उपप्रजाती आणि स्थान

• एस. ए. अलुको – स्कॅन्डिनेव्हियापासून भूमध्य आणि काळ्या समुद्रापर्यंत उत्तर आणि मध्य युरोप

• एस. ए. बिडुलफी – वायव्य भारत आणि पाकिस्तान

• एस. ए. हार्मसी – कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान

• एस.. ए. सँक्टिनिकोलई – पश्चिम इराण, ईशान्य इराक

• एस. ए. सायबेरिया – मध्य रशिया, युरल्सपासून पश्चिम सायबेरियापर्यंत

• एस. ए. सिल्व्हॅटिका – पश्चिम आणि दक्षिण युरोप, पश्चिम तुर्की

• एस. ए. विल्कोन्स्की – ईशान्य तुर्की आणि वायव्य इराण ते तुर्कमेनिस्तान

वरील सर्व उपप्रजातींच्या नोंदी या १७५८ ते १८९६ मध्ये करण्यात आल्या आहेत.