मुंबई: मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी मुलीची आणि जावयाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना देवनार परिसरात घडली. याबाबत गोवंडी पोलिसांनी तपास करत मुलीच्या वडिलांसह तिच्या भावाला आणि अन्य दोघांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१४ ऑक्टोबरला देवनार गावातील टेलिकॉम फॅक्टरी परिसरात असलेल्या एका विहिरीत परिसरातील काही मुले पोहण्यासाठी गेली होती. यावेळी या मुलांना एका तरुणाचा मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला असता त्याच्यावर अनेक वार करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासात मयत तरुणाचे नाव करण चंद्र (वय २२) असे असल्याचे पोलिसांना समजले. तसेच तो उत्तर प्रदेशातील असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. वर्षभरापूर्वी करण याने गुलनाज खान (वय २०) या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. गुलनाजच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी धारावी परिसरातून मुलीचे वडील रइसउद्दीन खान (वय ५०) याला ताब्यात घेतले. तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मुलगा सलमान खान आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने मुलीचीही अशाच प्रकारे हत्या केल्याची कबुली दिली.

हेही वाचा >>>भटक्या श्वानांना जेवण देताना अश्लील शेरेबाजी, जाब विचारल्यावर महिलेला मारहाण अन्…; बोरिवलीत धक्कादायक घटना

मुलीने प्रेमविवाह केल्याने खान कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी दोघांना जिवे मारण्याची योजना आखली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी या दोघांच्या लग्नाला मान्यता देत सासऱ्याने जावयाला आणि मुलीला धारावी येथील घरी बोलावले. त्यानंतर खरेदीच्या बहाण्याने त्यांनी पहिल्यांदा जावयाला देवनार परिसरात आणले. याठिकाणी त्याच्यावर चाकूहल्ला केल्यानंतर त्याचा मृतदेह येथील विहिरीत टाकला. त्यानंतर मुलीला कळंबोली परिसरातील एका निर्जन ठिकाणी नेत तिच्यावरही चाकूहल्ला केला. तिची ओळख पटू नये म्हणून वडिलांनीच तिचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन चारही आरोपींना अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brutal murder of daughter son in law out of anger for love marriage mumbai amy