तेलाची निर्यात करणाऱ्या मोठय़ा देशांपैकी असणाऱ्या सीरियावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला केल्याच्या अफवेने मंगळवारी भारतीय भांडवली बाजारासह परकीय चलन व्यवहारांना हादरा दिला. आधीच अडचणीत असलेल्या भारतीय बाजारात, सीरियातील हल्ल्यानंतर तेलाच्या किमती वाढण्याच्या भीतीचे थेट परिणाम दिसले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्क ६५१ अंशांनी कोसळला तर डॉलरच्यारुपयाने पुन्हा एकदा ६८चा तळ गाठला.
सीरियामध्ये रासायानिक अस्त्रांचा वापर झाल्याचे उघड झाल्यापासून अमेरिकेने या देशावर हल्ला करण्याची तयारी चालवली आहे. यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना देशांतर्गत राजकीय पाठिंबा वाढत आहे. त्यातच मंगळवारी आपल्या रडारने भूमध्य समुद्रात दोन क्षेपणास्त्र टिपल्याचे रशियाने जाहीर केल्याने सीरियावर हल्ला झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. याचा परिणाम जगभरासह भारतीय बाजारांवरही झाला.
दिवसाची सुरुवात १९ हजारावर करणारा सेन्सेक्स दुपापर्यंत मोठी घसरण नोंदविता झाला. दिवसअखेर त्यातील विस्तारित घसरण कायम राहिली. एकाच सत्रात ६५१ ही त्यातील घट १६ ऑगस्टच्या ७६९ या घसरणीच्या समकक्ष ठरली. गेल्या सलग चार व्यवहारात ९१८.०५ अंश वाढ नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने यारुपात प्रथमच घट आणि तिही मोठय़ा प्रमाणात नोंदविली. एचएसबीसी, नोमुरासह अनेक वित्तसंस्थांनी देशाच्या विकास दराचे अंदाज ४ टक्क्यांपर्यंत खुंटविल्यानंतर बाजारात पतमानांकन कमी करण्याची धास्ती निर्माण झाली. त्यातच सिरियातील अस्वस्थ वातावरणाची भर घसरणीला मोठय़ा आकडय़ाकडे घेऊन गेली. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात वाटणारी नफेखोरीची शक्यता गुंतवणूकदारांच्या चिंतेत परावर्तित झाली.
डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा त्याच्या ऐतिहासिक नीचांकासमीप जाताना ६८ च्या खाली स्थिरावला. दिवसभरात ६८.२५ पर्यंत घसरणारा रुपया दिवसअखेर काहीसा सावरत ६७.६३ वर थांबला. मात्र त्यातील दिवसअखेरची १६३ पैशांची घसरण ६७.६३ पर्यंत घेऊन गेली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या गव्हर्नरपदाची सूत्रे रघुराम राजन हे बुधवारी हाती घेणार असतानाच रुपयाने ६८ च्या वाकुल्या पुन्हा दाखवायला सुरुवात केली आहे. चलनाने ६८.८५ हा सार्वकालीक नीचांक यापूर्वीच नोंदविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा