उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या सर्वेसर्वा यांनी लखनऊमध्ये १५ जानेवारीला सर्वच राजकीय पक्षांमधील षडयंत्रांपासून दलित-बहुजन समाजाला सावध राहण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून बसपचे ५० हजार कार्यकर्ते लखनऊला जाणार आहेत. त्यानंतर हीच भूमिका घेऊन बसपने महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, खास करून रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाला लक्ष्य करण्याचे ठरविले आहे.  
पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात प्रत्येक राज्यात बहुजन समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बसपच्या विरोधात सत्ताधारी व विरोधी पक्षांनी हातमिळवणी केल्याचा मायावती यांचा आरोप आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाला आधी भाजपने समर्थन दिले आणि आता काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची भारिप-बहुजन महासंघाशी किंवा इतर गटांशी युती करणे किंवा भाजप-शिवसेनेचे रामदास आठवले गटाला बरोबर घेणे हेही याच षडयंत्राचा भाग आहे, असे बसपचे म्हणणे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दलित-बहुजन समाजाने अशा षडयंत्राला बळी पडू नये म्हणून त्यांना सावध करण्यासाठीच मायावती यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सावधान महामेळावा होणार आहे, अशी माहिती बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी दिली.  
लखनऊमध्ये १५ जानेवारीला रमाबाई आंबेडकर मैदानावर हा महामेळावा होणार आहे. २० लाख लोक बसतील एवढी क्षमता असलेले देशातील हे सर्वात मोठे मैदान आहे. या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातून ५० हजार कार्यकर्ते लखनऊला जाणार आहेत. हीच भूमिका घेऊन महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत प्रचार केला जाणार आहे. दलित समाजात बसपने आता जोरदार मुसंडी मारली आहे. रिपब्लिकन नेतृत्व कुणाची सत्ता आणण्यासाठी काम करीत आहे, हे प्रचारातून मांडले जाईल, असे त्यांनी सांगितले. एकंदरीत बसपने पहिल्यांदाच थेट ‘आरपीआय’च्या विविध गटांच्या विरोधात मैदानात उतरण्याची तयारी केल्याचे दिसते.

Story img Loader