दलित राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि निवडणुकीच्या काळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरणारा कांशिराम संस्थापित व मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्ष (बसप) महाराष्ट्रात फुटीच्या उंबरठय़ावर उभा आहे. गेली तीस वर्षे पक्ष स्थापनेपासून पक्षात निष्ठेने काम करणारे आणि अनेक राज्यांचे प्रभारीपद संभाळणारे सरचिटणीस डॉ. सुरेश माने यांनी पक्षातील मनमानीच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे.
महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरून काढल्यामुळे नाराज झालेल्या माने यांनी अन्य राज्यांचे प्रभारीपद संभाळण्यास नकार दिला आहे. पक्ष दुभंगण्याची ही चिन्हे मानली जात असून त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बसपच्या स्थापनेच्या वेळी कांशिराम यांच्यासोबत महाराष्ट्रातून जे काही मोजके कार्यकर्ते होते, त्यात सुरेश माने यांचा समावेश होता. गेली तीस वर्षे ते पक्षाचे निष्ठने काम करीत आहेत. त्यांच्यातील बुद्धिमत्ता, संघटन कौशल्य हेरून मायावती यांनी त्यांच्यावर अनेक राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली होती. परंतु त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर ठेवल्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. गेली तीस वर्षे लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवूनही पक्षाला महाराष्ट्रात खाते खोलता आले नाही.  
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर डॉ. सुरेश माने यांच्याकडे केरळ, आंध्र प्रदेश व तेलंगणाबरोबर महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी विधानसभा निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा, खान्देश पिंजून काढला.  
मात्र ११ एप्रिल २०१५ रोजी लखनौ येथे झालेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मायावती यांनी माने यांच्याकडील महाराष्ट्राचे प्रभारीपद काढून घेतले. त्यामुळे नेतृत्वाकडून अपमानित झालेल्या माने यांनी अन्य राज्यांचे प्रभारीपद स्वीकारण्यास नकार दिला. माने यांच्यासारख्या संयमी नेत्याने महाराष्ट्राचे प्रभारीपद असेल तरच, इतर राज्यांची जबाबदारी घेऊ, अन्यथा नाही, असा बंडाचा पवित्रा घेतला.
या संदर्भात माने यांच्याशी संपर्क साधला असता, महाराष्ट्राचे प्रभारीपद काढून घेतल्यामुळे, अन्य राज्यांच्या प्रभारीपदातूनही मुक्त करावे, अशी विनंती आपण मायावती यांना केली आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र  अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.