केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांची घोर निराशा झाली असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. “मुंबईकरांसाठी अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नाही. उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी वेगळे पद निर्माण करण्याची घोषणा झाली नाही की त्यासाठीची तरतूद देखील यामध्ये नाही. मुंबईकरांची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोर निराशा केली आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

“सरकारच्या हातात शिल्लक राहिलेलं शेवटचं रत्न अर्थात एलआयसी इंडिया विकून त्यातून काही निधी उभारण्याचा घाट या सरकारने घातला आहे. अर्थव्यवस्थेची दुर्दशा लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. पण एलआयसीनंतर सरकारकडे विकण्यासारखं काहीही उरणार नाही.त्यानंतर हे सरकार काय करणार?,” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

“अर्थसंकल्प सादर करत असताना शेअरबाजार तब्बल ७०० अंकांनी कोसळला. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत वर्षातील सर्वात मोठे भाष्य संसदेत होत असताना बाजार कोसळला यावरुन या अर्थसंकल्पात काहीच अर्थ नाही हे उघड आहे,” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.