“महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे. आकडे अर्थमंत्री देत आहेत. त्यातले किती आकडे खरे आहेत? किती खोटे आहेत? हे सहा महिन्यात कळेल.” अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
” देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा हा महाराष्ट्रातून विशेष करून मुंबईतून मिळणाऱ्या महसूलावर टिकून असतो. पण सर्वाधिक निराशा ही महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचं देणं लागतं. त्या संदर्भात काही आहे काय? दोन शहरांना तुम्ही मेट्रोचा गुळ लावलेला आहे. पण जी मेट्रो केंद्र सरकारने मुंबईत अडकवून ठेवली आहे. त्या विषयी कुणी बोलायचं? असे अनेक विषय आहेत. तुमच्या खिशात काही आहे का? तुमच्या खिशात काही नाही. मराठीत एक म्हण आहे, खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे दिल्लीचे बाजीराव हे देशाला वाटत चालले आहेत, पण आहे का आपल्याकडे? बघा जरा. महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे. महाराष्ट्राने देशाला सातत्याने देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र कायम अन्याय होत आलेला आहे. अन्याय म्हटल्या पेक्षा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे कुणी पाहत नाही.” असं देखील यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.
आणखी वाचा- Budget 2021 – …तर त्याला एका राजकीय पक्षाचं बजेट म्हणावं – संजय राऊत
” अर्थमंत्री जे आकडे मांडत आहेत, त्या आकड्यात आम्हाला फार पडायचं नाही. ते आकडे वर्षानुवर्षे येतच असतात. ते किती खरे असतात, किती खोटे असतात हे सहा महिन्यांनी कळतं. आता काहीजण या अर्थ संकल्पाचा अभ्यास करत असतील, त्यातून काही काढतील. पण मला असं वाटतं की, थोडं अर्थसंकल्पामध्ये तो कुणाचाही असो आर्थिक थापा मारणं हे बंद केलं पाहिजे. सामान्य माणसाला केवळ भूकेची व पोटाची भाषा कळते, तरूणांना रोजगाराची भाषा कळते. अशा काही सोप्या भाषेत जर तुम्ही अर्थसंकल्प सांगितला किंवा मांडला व त्यातून काही कृती झाली. तर त्या अर्थसंकल्पाची आम्हाला पाठ थोपटता येईल.” असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.
आणखी वाचा- Budget 2021 : “पेट्रोल-डिझेल १००० रुपये लिटर करुन मोदी सरकारला लोकांना मारायचं असेल”
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आलेली असून दोन लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी ही तरतूद ९४ हजार कोटी इतकी होती. याशिवाय करोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.