मुंबई : श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने मुंबईकरांकडून लेखी सूचना मागवल्या आहेत. नागरिकांना १७ जानेवारीपर्यंत सूचना पाठवता येणार आहेत. महापालिका सभागृहाची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवटीतील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. तर मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिका तयार करीत असलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात लोक सहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांकडून सूचना मागवल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई – मेलवर शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. अर्थसंकल्प सादर करण्यास एक महिना उरलेला असताना पालिका प्रशासनाने हे आवाहन केले आहे.

हेही वाचा…२९ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने २०२५-२६ या वर्षाचे उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरू आहे. हे अर्थसंकल्पीय अंदाज ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अथवा तत्पूर्वी सादर करण्यात येणार आहे. पालिकेची मुदत संपल्यामुळे नगरसेवकांच्या सूचनांशिवाय तयार करण्यात येणारा हा दुसरा अर्थसंकल्प असून त्याकरीता या सूचना मागवण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी ५९ हजार ९५४ कोटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. एका राज्याच्या अर्थसंकल्पाइतके या अर्थसंकल्पाचे आकारमान असते. मार्च २०२२ मध्ये पालिकेची मुदत संपल्यापासून सध्या मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प विशेष असणार आहे. पालिकेच्या घटलेल्या मुदतठेवी, वाढलेले खर्च यामुळे या अर्थसंकल्पाला महत्त्व आहे. मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून, लोकप्रतिनिधी नसल्याने २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प गेल्यावर्षीप्रमाणे केवळ प्रशासन स्तरावर सादर केला जाणार आहे.

हेही वाचा…४९५७ कोटींच्या बँक फसवणूकीप्रकरणी मुंबई व दिल्लीती १४ ठिकाणी ईडीचे छापे, ५ कोटी ४० लाखांची मालमत्ता गोठवली

ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील त्यांनी शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ पर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत पोहोचेल, अशा बेताने प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारित इमारत, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१ या पत्त्यावर पाठवाव्यात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget of bmc for coming year will be presented in first week of february mumbai print news sud 02