मुंबई : निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षात विकासकामांवर होणाऱ्या भांडवली खर्चासाठी भरघोस तरतूद केली होती, मात्र डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ ५२.२३ टक्के तरतुदी खर्च करण्यात पालिका प्रशासनाला यश आले.
तब्बल ३६ हजार कोटींच्या तरतुदींपैकी केवळ १८ हजार कोटींच्या तरतुदी खर्च झाल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात पालिकेने ५९ हजार ९५४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्पाचे आकारमान वर्षानुवर्षे वाढत असून त्या तुलनेत खर्च मात्र होत नाहीत. तरतुदी खर्च झालेल्या नसल्या तरी आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान आणखी वाढण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा >>>अर्थसंकल्पाचा फुगवटा यंदाही कायम? ३६ हजार कोटींपैकी केवळ १८ हजार कोटीच खर्च
मुंबई महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाचे आकारमान ६० हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र चालू आर्थिक वर्षात पालिकेने मांडलेल्या ५९ हजार कोटींच्या अर्थसंकल्पातील अनेक भांडवली तरतुदी अद्याप कागदावरच असल्याचे दिसून आले आहे.
आकारमान वाढ सुरूच
सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचे आकारमान हे एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पाइतके मोठे असते, मात्र त्यातील तरतुदींचा पूर्ण विनियोग बहुतांशी होतच नाही. ७० ते ७५ टक्के भांडवली तरतुदीच वापरल्या जातात. मात्र आधीच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठे आकारमान दरवर्षी केले जात असल्यामुळे वर्षानुवर्षे अर्थसंकल्पाचे आकारमान तेवढे वाढते आहे.
आर्थिक वर्ष संपण्यास अजून तीन महिने शिल्लक असून या काळात अनेक प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्ते विभाग, पूल, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, सागरी किनारा मार्ग अशा मोठ्या प्रकल्पांसाठीच्या तरतुदी वापरण्यात आल्या आहेत. विकास आराखड्यातील विविध कामांच्या अंमलबजावणीसाठी तब्बल १०५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २३६ कोटी म्हणजेच २९.५७ टक्के खर्च झाले आहेत.
हेही वाचा >>>भूसंपादनाआधी कोट्यवधींची कंत्राटे; महापालिका अधिकाऱ्यांकडून २२ हजार कोटींची खैरात
खर्चाच्या बाबी तरतूद खर्च
सागरी किनारा प्रकल्प २९०० कोटी १७७५ कोटी ६१.२३ टक्के
गोरेगाव मुलुंड जोड रस्ता १८७० कोटी ५०० कोटी २६.७४ टक्के
रस्ते व वाहतूक ३४०० कोटी १९९३ कोटी ५८.६४ टक्के
पर्जन्य जलवाहिन्या १९३० कोटी ९५३ कोटी ४९.४० टक्के
पूल ३३६० कोटी २३८४ कोटी ७०.९६ टक्के
घनकचरा विभाग प्रकल्प २३० कोटी २०४ कोटी ८८.८७ कोटी
आरोग्य विभागाच्या तरतुदी तशाच
चालू आर्थिक वर्षात पालिकेने आरोग्य विभागासाठी ७१९१.१३ कोटींची तरतूद केली होती. त्यात भांडवली खर्चासाठी १७१६ कोटींच्या तरतुदी केल्या आहेत. त्यापैकी कवेळ ६५३ म्हणजेच केवळ ३८ टक्के निधी खर्च झाला आहे. तर वैद्याकीय महाविद्यालयांसाठी असलेल्या निधीपैकी केवळ ७ टक्के निधी खर्च झाला आहे.