अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांची कसोटी; उद्यापासून सुरुवात
संसद किंवा विधिमंडळामध्ये विरोधक आक्रमक तर सत्ताधाऱ्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत असला तरी राज्यात युतीची सत्ता आल्यापासून उलटे चित्र आहे. मंत्र्यांवर कितीही आरोप झाले तरी सत्ताधारी बिनधास्त तर विरोधक उगाचच अवघडलेल्या स्थितीत बघायला मिळतात. काँग्रेसने आपल्या आमदारांना भाजपच्या विरोधात आक्रमक होण्याचे फर्मान सोडल्याने यंदा तरी चित्र बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विधिमंडळाच्या पाच आठवडय़ांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होत असून, सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याकरिता विरोधकांकडे बरेच मुद्दे असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, डॉ. रणजित पाटील आदी भाजप मंत्र्यांच्या विरोधात आरोप झाले होते. चिक्की घोटाळाप्रकरणी पंकजा मुंडे यांच्यावर तर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते. एवढी संधी असूनही तीन आठवडय़ांच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये विरोधकांनी मंत्र्यांच्या विरोधातील प्रकरणे बाहेर काढली होती.
एवढी चालून आलेली आयती संधी विरोधकांना गमाविली होती. मंत्र्यांवर आरोप झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मंत्र्यांना अभय देताना विरोधकांना खणखणीत उत्तर दिले होते. परिणामी मंत्र्यांवर आरोप होऊनही सत्ताधारी आक्रमक तर विरोधक निष्प्रभ, असे चित्र होते.
छगन भुजबळ, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विरोधातील चौकशीमुळे राष्ट्रवादी जरा दमानेच घेते. त्यातच राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाढत्या जवळिकीमुळे अनेकदा काँग्रेसला एकटे पाडून राष्ट्रवादीने भाजपला मदत होईल, अशी भूमिका घेतली आहे.
काँग्रेसमध्येही आनंदीआनंद आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मर्यादा येतात. माजी मंत्री फारसे तोंड उघडत नाहीत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली तरी पक्षाच्या अन्य आमदारांची त्यांना साथ मिळत नाही. काँग्रेस आमदारांच्या नमते घेण्याच्या भूमिकेची दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांनी दखल घेतली आहे.