मुंबई: नवी मुंबई येथील एका व्यवसायीकावर बुधवारी रात्री चेंबूर परिसरात गोळीबार करण्यात आला होता. जखमी व्यवसायीकावर चेंबूर परिसरातील झेन रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
सद्रुद्दीन खान (५०) असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यवसायिकाचे नाव असून ते बेलापूर परिसरात वास्तव्यास आहेत. ते दादर येथून बुधवारी रात्री १० च्या सुमारास नवी मुंबईच्या दिशेने जात होते. शीव-पनवेल मार्गावरील चेंबूरच्या डायमंड उद्यान परिसरात त्यांची मोटारगाडी थांबली होती. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर चेंबूरमधील झेन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चेंबूरच्या डायमंड उद्यान परिसरात मोठ्या वर्दळीचा परिसर असून घटनेनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ही घटना शीव – पनवेल महमार्गावर घडल्याने या मार्गावर रात्री वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून वाहनांना वाट मोकळी करून दिली. पोलिसांनी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असून रस्त्यावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.