मुंब्रा येथील जीवनबाग परिसरातील ‘बानो’ कॉम्पलेक्समधील पाच क्रमांकाची पाच मजली अनधिकृत इमारत शनिवारी सकाळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चौघांपैकी एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.
इमारत कोसळण्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उर्वरित दोघांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. विशेष म्हणजे, ही घटना घडण्याआधी इमारतीचे प्लॅस्टर पडू लागल्याची जाणीव होताच २८ कुटुंबे इमारतीबाहेर पडली. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच दुर्घटनाग्रस्त इमारत उभारणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत. गेल्या सहा महिन्यांत मुंब्रा परिसरात इमारत कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.  
या दुर्घटनेत हनीफ काझी (३०) या तरुणाचा मृत्यू झाला तर इमारतीच्या ढिगाऱ्याखालून समीरा काझी (२५) या महिलेस सुखरूप बाहेर काढण्यात आले असून तिला उपचारांसाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले
आहे.
 मुंब्रा येथील जीवनबाग परिसरात ‘बानो कॉम्प्लेक्स’नावाचे अनधिकृत इमारतींचे संकुल असून त्यामधील पाच क्रमांकाची पाच मजली इमारत शनिवारी सकाळी कोसळली. २००४ मध्ये म्हणजेच नऊ वर्षांपूर्वी ही इमारत नाल्यालगतच उभारण्यात आली होती. या इमारतीमध्ये २८ कुटुंबे म्हणजे साधारणत: १२५ रहिवाशी वास्तव्य करीत होते. शनिवारी सकाळी सहा वाजता या इमारतीच्या प्लॅस्टरचा काही भाग कोसळू लागला. त्या आवाजाने जागे झालेल्या अस्लम या रहिवाशाने तातडीने इतरांना उठवून माहिती दिली. त्यामुळे सर्व रहिवाशी इमारतीबाहेर आले. त्यासाठी शेजारील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनीही त्यांना बाहेर पडण्यास मदत केली. त्यानंतर सकाळी आठ वाजता अचानकपणे तडे जात इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.
या घटनेनंतर महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम आणि त्यांचे पथक, नागरी संरक्षण केंद्राचे उपनियंत्रक लक्ष्मीकांत दावरे, विभागीय वार्डन बिमल नाथवानी, आयुब शिकलघर, ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख अरविंद मांडके आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा मलबा पडल्याने शेजारील  इमारतीलाही धोका निर्माण झाला असून त्यातील रहिवाशांनाही इमारतीबाहेर काढण्यात आले आहे. तसेच या घटनेच्या पाश्र्वभूमीवर आसपासच्या इमारतीतील रहिवाशांना घराबाहेर काढून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. मात्र, त्यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता, असे महापालिका सूत्रांनी सांगितले.
*कोणत्याही क्षणी इमारत कोसळेल, हे माहिती असूनही घरातील किमती सामान्याच्या काळजीने बाहेर जाऊन पुन्हा दोघे इमारतीत शिरले. तसेच अन्य दोघे आवाहन करूनही इमारतीबाहेर पडले नाहीत. त्यामुळे ते दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले, असे येथील रहिवाशांनी सांगितले.
*परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध नसल्याने नाइलाजाने धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या भल्यासाठी क्लस्टर्ड डेव्हलपमेंटचा निर्णय घेण्यात अक्षम्य दिरंगाई करून शासन ठाणेकरांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. येत्या महिन्याभरात यासंदर्भात निर्णय न घेतल्यास ठाणेकर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा त्यांनी या वेळी दिला. तसेच जिल्ह्य़ातील आमदार मुख्यमंत्र्यांच्या वर्षां निवासस्थानी आमरण उपोषण करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
*या इमारतीतील २८ कुटुंबांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देऊन ठाण्यातील दोस्ती संकुलात पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिली.

Story img Loader