माझगावमधील डॉकयार्ड रोडवरील महापालिका कामगारांच्या वसाहतीमधील चार मजली इमारत शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत ४० जण ठार झाले असून ७३ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र आणखी अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मेसर्स मामामिया डेव्हलपर्सच्या अशोक मेहता याच्यावर शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाजवळच्या ब्रह्मदेव खोत मार्गावरील बाबू गेनू मंडईजवळ ही इमारत होती. या इमारतीमध्ये पालिकेच्या बाजार विभागातील कामगार, हलालखोर आणि शिपाई यांची कुटुंबे राहत होती. इमारतीमधील एकूण २८ पैकी २१ सदनिकांमध्ये पालिकेचे कामगार वास्तव्यास होते. तर सात सदनिका रिकाम्या होत्या. अग्निशमन दलाच्या मदतीला ‘राष्ट्रीय आपत्ती बचाव दल’ अर्थात एनडीआरएफच्या पथकाने धाव घेतली. त्याचबरोबर तळेगाव येथून एनडीआरएफची आणखी दोन पथके तातडीने मुंबईत आली. पालिका अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
चिंचोळा रस्ता, बघ्यांची गर्दी आणि पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. २९ जखमींना जे. जे. रुग्णालय आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरूच होते.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेने केलेल्या पाहणीनुसार धोकादायक इमारतींच्या ‘सी-२’ श्रेणीमध्ये या इमारतीचा समावेश करण्यात आला होता. महिनाभरापूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. य्आराखडा तयार झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार होती, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले.
दोषींवर कठोर कारवाई
या धोकादायक इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. तसेच विकासकाचीही नियुक्ती केली गेली होती. मग दुरुस्तीचे काम सुरू करण्यास विकासकाने विलंब का केला? या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम केले होते का? आदींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून तांत्रिक तसेच अन्य बाबींचा अभ्यास करून ही समिती उद्या आपला अहवाल सादर करणार आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले.
दोन लाखांची मदत
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर जखमींच्या उपचारावरील सर्व खर्च महापालिका करणार आहे.
सुखरुप बाहेर
राम चेंदवणकर ,आशा पवार,शामजी चावडा,सुलभा कदम,संकेत जाधव. नवीन पवार धीरज जाधव, अल्पेश महादेव कदम, महादेव रामचंद्र कदम,तेजल चावडा,रेश्मा झगडे अजय जवळेकर,विजय राऊत,दिनेश कदम,शेख नूर,राम,रोशन शर्मा,अहमद समीर शेख,साजिद सय्यद
जे. जे रुग्णालयात दाखल
पूजा पाटणकर,भाग्यश्री कांबळे,महादेव कांबळे,कविता कांबळे ,गणेश गुरव, दिप्तेश कदम विजय कांबळे,देवेंद्र राठोड,चेतना झगडे,अनिश कदम,हरुन शेख,तोकीर अहमद शेख हबीब शेख,अजय चेंदवणकर,शबीर आलम,हर्षदा वाघमारे,राजेश्री वाघमारे,संजय वाघमारे,संजय राठोड,मीनल सोलंकी ,अशोक सोलंकी,मयुर दुलेरा
दुर्घटनेतील मृतांची नावे
(जे.जेमधील)अनिल चावडा,जमुना चावडा, अनंत पवार,लाखो देवजी चावडा
माधवी कदम ,एक पुरुष (नाव कळलेले नाही) (नायर) एक महिला (नाव कळले नाही)
पत्रकार योगेश पवार बेपत्ता
या दुर्घटनेच्या वार्ताकनाच्या गडबडीत एका बातमीने पत्रकारांना अस्वस्थ केले. ही बातमी होती पत्रकार योगेश पवारची. याच बाबू गेनू मार्केट इमारतीत पत्रकार योगेश पवार रहात होता. योगेशच्या बातमीने सर्वाच्याच काळजात धस्स झालं. त्यातच त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी आली. दिवसभर सुरू असलेला योगेशचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरू होता. बाबू गेनू मार्केट इमारतीत तो दुसऱ्या मजल्यावर रहात होता. त्याच्या विनम्र स्वभावामुळे तो सर्व माध्यमात लोकप्रिय आणि लाडका होता. सकाळीच त्याच्या वडिलांचा ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडला. पण योगेश नव्हता. त्याच मजल्यावर राहणाऱ्या वाघमारे कुटुंबातील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की योगेश सकाळी पाणी भरण्यासाठी उठला होता. इमारत कोसळते हे लक्षात आल्यावर तो खालच्या दिशेने धावला होता. त्याला शोधण्यासाठी पत्रकार मित्रांनी रुग्णालय पालथे घातले होते. पण जखमीत त्याचे नाव दिसत नसल्याने चिंता वाढत होती. त्याचे दोन्ही फोन नॉट रिचेबल आणि बंद झाले होते. ढिगाऱ्यातून योगेश सुखरूप बाहेर येईल अशीच प्रार्थना सर्वजण करत आहेत. मोबाईलमधील व्हॉटस अॅपवर योगेश दिसतोय. गुरूवार, लास्ट सीन.रात्री उशिरा ११:४४
गर्भवती महिला सुखरूप
महिन्याभरापूर्वी बाळंतपणासाठी माहेरी आलेली नमिता शिंगाडे (३३) या दुर्घटनेतून सुखरूप बचावली. ती आठ महिन्यांची गर्भवती आहे. नमिताची प्रकृती ठीक असून तिच्या गर्भाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्घटनेत नमिताचे वडील अशोक पवार, आई जयश्री आणि बहीण नीलम बेपत्ता आहेत. तिच्या हाताला लागले आहे. मात्र जखम फारशी गंभीर नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. नमिताचे पती तिच्यासोबत आहेत. तिला या दुर्घटनेबद्दल कल्पना दिली नसल्याचे तिच्या चुलत बहिणीने सांगितले.
मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर जखमींच्या उपचारावरील सर्व खर्च महापालिका करणार आहे.
लहानग्या भाग्यश्रीला सीडीचा आधार
मुंबई : डॉकयार्ड रोड येथील महापालिका कामगार वसाहतीमधील इमारत कोसळली, तेव्हा दोन भिंतींमध्ये पोकळी निर्माण झाली होती. अशाच एका पोकळीत कांबळे कुटुंबीय अडकले होते. महादेव कांबळे, त्यांची पत्नी सविता आणि ३ वर्षांची भाग्यश्री आत अडकली होती. त्या पोकळीत अंधार होता, पण श्वासोच्छ्वास करता येत होता. लहानगी भाग्यश्री रडत होती. तिला आईवडील धीर देत होते. उकडत असल्याने ती बेचैन होती. तिला वारा घालण्यासाठा काही मिळते का ते पाहण्यासाठी आई-वडिलांनी अंधारात चाचपले तेव्हा एक सीडी हाती लागली. त्या सीडीने ते भाग्यश्रीला वारा घालू लागले. दरम्यान, बचाव पथकाने त्यांच्यावरचा मातीचा ढिगारा उपसला आणि आत प्रकाश आला. मग कांबळे कुटुंबीयांनी मदतीसाठी धावा केला. बचाव पथकाने तिघांची सुखरूप सुटका केली. दुसऱ्या मजल्यावर राहणारे जाधव दाम्पत्यही अशाच दोन भिंतींमधील पोकळीत अडकून बचावले.
नवदाम्पत्य बेपत्ता.
कल्याणच्या निधीचे अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ती सासरी डॉकयार्डला राहायला आली होती. निधी जाधव, तिचे पती नीलेश आणि सासू-सासरे या इमारतीत राहत होते. दुर्घटनेत चौघेही बेपत्ता आहेत. नीलेश एमबीए झाला आहे, तर निधीसुद्धा उच्चशिक्षित असून खासगी कंपनीत कामाला होती.
समिती स्थापन
इमारत दुर्घटनेची तांत्रिक कारणे शोधण्यासाठी पालिकेचे संचालक (अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्प) लक्ष्मण व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेच्या प्रशासकीय चौकशीसाठी उपायुक्त (परिमंडळ ३) रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समित्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पर्यायी निवासाची व्यवस्था
दुर्घटनाग्रस्त रहिवाशांसाठी डॉकयार्ड परिसरात पर्यायी निवास व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
१५ तासांनी सावंत कुटुंबीय सुखरूप बाहेर
दुर्घटना घडल्यापासूनच सुरू असलेले बचावकार्य सतत सुरू आहे. रात्री ९च्या सुमारास ढिगाऱ्यातून सावंत कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. नरेश सावंत, त्यांच्या पत्नी आणि सात वर्षांचा मेघ यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र एवढय़ा वेळानंतरही ते सुखरूप असल्याने आत अडकलेले इतरही सुखरूप बाहेर येतील असा विश्वास त्यांच्या नातेवाईकांना वाटू लागला.
फोटो गॅलरी : डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटना
सीताराम कुंटे, आयुक्त – मुंबई मनपा
इमारतीच्या ढिगा-याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे. सदर इमारतीची परिस्थिती काय होती आणि दुरूस्ती केव्हा करण्यात आली होती याची तपशीलवार माहिती त्या त्या विभागाकडून घेण्यात येईल. सदर इमारत म्हणून घोषित करण्यात आली होती, तरीही ती पडण्याच्या अवस्थेत नव्हती. अतिधोकादायक इमारती महानगरपालिकेतर्फे रिकामी करण्यात आलेल्या आहेत. ही इमारत अति धोकादायक इमारतींच्या ‘सी टू बी’ गटात मोडत होती. सध्या घटनास्थळी माझगांव डॉक, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमनदलाचे लोक दाखल झाले असून, बचावकार्य वेगात सुरू आहे.
संबंधित बातम्या-
* भिवंडीजवळ इमारत कोसळून दोघांचा बळी, २६ जखमी
* मृत्यूच्या दाढेतून सुटका..