माझगावमधील डॉकयार्ड रोडवरील महापालिका कामगारांच्या वसाहतीमधील चार मजली इमारत शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत ४० जण ठार झाले असून ७३ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र आणखी अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मेसर्स मामामिया डेव्हलपर्सच्या अशोक मेहता याच्यावर शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाजवळच्या ब्रह्मदेव खोत मार्गावरील बाबू गेनू मंडईजवळ ही इमारत होती. या इमारतीमध्ये पालिकेच्या बाजार विभागातील कामगार, हलालखोर आणि शिपाई यांची कुटुंबे राहत होती. इमारतीमधील एकूण २८ पैकी २१ सदनिकांमध्ये पालिकेचे कामगार वास्तव्यास होते. तर सात सदनिका रिकाम्या होत्या. अग्निशमन दलाच्या मदतीला ‘राष्ट्रीय आपत्ती बचाव दल’ अर्थात एनडीआरएफच्या पथकाने धाव घेतली. त्याचबरोबर तळेगाव येथून एनडीआरएफची आणखी दोन पथके तातडीने मुंबईत आली. पालिका अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
चिंचोळा रस्ता, बघ्यांची गर्दी आणि पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. २९ जखमींना जे. जे. रुग्णालय आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरूच होते.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेने केलेल्या पाहणीनुसार धोकादायक इमारतींच्या ‘सी-२’ श्रेणीमध्ये या इमारतीचा समावेश करण्यात आला होता. महिनाभरापूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. य्आराखडा तयार झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार होती, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा