मस्जिद बंदरमध्ये इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. लाकडाचा ढाचा असणारी ही इमारत पाडण्याचा आदेश म्हाडाने दिला होता. इमारतीला काही दिवसांपुर्वी आग लागली होती, त्यानंतर एका खासगी कंत्राटदाराला इमारत पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. इमारत पाडण्याचं काम सुरु असताना सगळा ढाचा कोसळला. यावेळी पाच कर्मचारी या ठिकाणी काम करत होते. इमारत कोसळल्याने हे सर्व कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तिघांची सुखरुप सुटका केली होती. तर उर्वरित दोघा जखमींना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इमारत धोकादायक असल्याने त्यामध्ये कोणीही राहत नव्हतं.
जे जे रुग्णालयातील डॉ राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोघांच्याही डोक्याला गंभीर जखम झाली होती. यामधील एकाचा रुग्णालयात आणलं तेव्हाच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्यावर उपचार सुरु आहेत”. मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी सय्यद इमारतीला आग लागली होती. ५ ऑगस्टला ही आग विझवण्यात आली होती. इमारतीचा ढाचा लाकडाचा असल्याने म्हाडाने इमारत पाडण्याचा आदेश दिला होता.