मुंबई : वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने इमारती प्रतिबंधित करण्याबाबतच्या नियमावलीत बदल केला आहे. इमारतीतील २० टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये करोना रुग्ण असल्यास संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात येणार आहे.
मुंबईत वेगाने रुग्ण वाढत असून ओमायक्रॉन या नवीन विषाणू प्रकाराचे रुग्णही आढळू लागले आहेत. यावेळी संसर्गाचा वेग जास्त असल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने इमारत प्रतिबंधित करण्याबाबतच्या नियमात बदल केला आहे. यानुसार एखाद्या इमारतीत, संकुलात किंवा गृहनिर्माण संस्थेत जेवढी घरे आहेत त्यापैकी २० टक्के घरांमध्ये करोनाचे रुग्ण असतील तर ती इमारत प्रतिबंधित केली जाणार आहे. अशा इमारतीतील रुग्ण व त्यांच्या निकट संपर्कातील रहिवाशांसाठीही नियम घालून देण्यात आले आहेत. रुग्णांनी गृह विलगीकरणाचे नियम कटाक्षाने पाळावे, असे आदेश पालिकेने दिले आहेत.
नियमावली काय?
* किमान दहा दिवस रुग्णाला वेगळे अलगीकरणात ठेवावे, तर निकट संपर्कातील लोकांनी सात दिवस गृह विलगीकरणात राहावे. पाचव्या किंवा सातव्या दिवशी त्यांच्या चाचण्या कराव्यात.
* गृह विलगीकरणातील रुग्णांच्या कुटुंबाला अत्यावश्यक वस्तू, औषधांचा पुरवठा होईल याची काळजी इमारतीतील व्यवस्थापनाने घ्यावी.
* पालिकेच्या विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना रहिवाशांनी सहकार्य करावे.
* इमारतीतील र्निबध हटवण्याचा निर्णय विभाग कार्यालय स्तरावर घेतला जावा.