लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : कबुतर दाखवण्याच्या बहाण्याने नऊ वर्षांच्या मुलीला गच्चीवर नेऊन तिचा विनयभंग करणाऱ्या ५१ वर्षीय सुरक्षा रक्षकाला नुकतीच गोरेगाव पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी खासगी शिकणीसाठी तेथे आली होती. आरोपी सुरक्षा रक्षकाविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी नेहमीप्रमाणे ७ मार्च रोजी शिकवणीला गेली होती. त्यावेळी तेथील इमारतीतील सुरक्षा रक्षकाने तिला कबुतर दाखवण्याच्या बहाण्याने गच्चीवर नेले व तिचा विनयभंग केला. या प्रकारमुळे पीडित मुलगी घाबरली. त्यानंतर ती शिकवणीला जाण्यास घाबरत होती. पीडित मुलीच्या आईने १२ मार्च रोजी तिला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला तो काम करीत असलेल्या इमारतीमधून अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.