लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अंबोली पोलिसांनी गुरूवारी अटक केली. आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत(पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नऊ वर्षांची पीडित मुलगी कुटुंबियांसह अंधेरी परिसरात राहते. सोमवारी (ता.२३) सायंकाळी पीडित मुलगी खेळण्यासाठी बाहेर गेली होती. तेथून परतत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिला पाठीमागून पकडून तिची छेड काढली. याप्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी अंबोली पोलिसांकडे तक्रार केली.
त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर २६ वर्षीय तरूणाला अटक केली. आरोपी पीडित मुलीच्या इमारतीचा सुरक्षा रक्षक आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील लालगंज येथील रहिवासी आहे. आरोपीविरोधा यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.