मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रे गांधीनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या अवैध बांधकामाविरोधात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून उद्या मंगळवारी हातोडा चालविण्यात येणार होता. मात्र त्याआधीच कार्यालय असलेल्या इमारतीच्या सोसायटीकडून स्वत:हून सोमवारी पाडकामास सुरुवात करण्यात आली. दिवसभरात ८० टक्के पाडकाम पूर्ण झाले आहे.
गांधीनगर येथील इमारत क्रमांक ५७ आणि ५८ मधील मोकळय़ा जागेत अनिल परब यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. हे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार विलास शेलगे नावाच्या एका व्यक्तीने २०१९ मध्ये म्हाडाकडे केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या बांधकामाविरोधात कारवाईची मागणी केली होती. या तक्रारींची दखल घेत मुंबई मंडळाने अवैध बांधकामाविरोधात नोटीस बजावली होती. आतापर्यंत पाडकामाची कारवाई झाली नव्हती. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांच्याकडून पुन्हा करण्यात आली. त्यानुसार मुंबई मंडळाने उद्या, मंगळवारी या बांधकामावर हातोडा चालविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या कारवाईसाठी पोलीस संरक्षणही घेण्यात आले होते. मात्र सोमवारी सोसायटी आणि परब यांच्याकडून पाडकाम सुरु झाले. रात्री उशिरापर्यंत ८० टक्के पाडकाम पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. आता मंगळवारी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.