ठाणे शहरातील १९७४ पूर्वीच्या आणि नवी मुंबईतील धोकादायक इमारतींना वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा तत्त्वत: निर्णय घेण्यात आल्याचे राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट करण्यात आले.
ठाणे शहरातील १९७४ पूर्वीच्या इमारतींना वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक देण्याबाबत ठाणे महानगरपालिकेचा ठराव राज्य शासनाला प्राप्त झाला आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे नगरविकास खात्याचे राज्यमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सांगितले.
ठाणे शहरातील १९७४ पूर्वीच्या इमारतींच्या पुनर्बांधणीकरिता जादा चटईक्षेत्र निर्देशांक दिला जात नाही. परिणामी या इमारतींमधील रहिवाशांचे हाल होत आहेत याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले होते. मुंबईच्या धर्तीवरच ठाणे जिल्ह्य़ातील कोळीवाडय़ांच्या पुनर्विकासाकरिता जादा चटईक्षेत्र निर्देशांक देण्याबाबत विचार करावा, अशी मागणीही केली गेली. त्यावर विचार करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.
नवी मुंबईतही जादा चटईक्षेत्र
नवी मुंबईतील धोकादायक इमारतींना २.५ पर्यंत चटईक्षेत्र निर्देशांक देण्याबाबत येत्या महिनाभरात निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल राष्ट्रवादीचे संदीप नाईक यांनी नापसंती व्यक्त केली. नक्की जादा चटईक्षेत्र निर्देशांक किती देता येईल याबाबत पुण्यातील शहर विकास विभागाच्या महासंचावकांकडून अभिप्राय मागविण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले.

Story img Loader