मुंबई : जन्मत:च पाठीचा मणका वाकडा असल्याने वारंवार पाठ दुखणे, चालताना उजवा पाय दुखणे, जास्त वेळ चालण्यास अडचणी येणे अशा अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या बुलढाण्यातील आदिनाथ गंधे (२२) या तरुणावर जी.टी. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारा आर्थिक भार हा रुग्णालयातील समाजसेवा विभागाने उचलल्याने या तरुणावर शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. शस्त्रक्रियेनंतर हा तरुण कोणत्याही त्रासाशिवाय दैनंदिन आयुष्य जगत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडराजा तालुक्यातील बोलखेडी गंधे या गावामध्ये राहत असलेल्या आदिनाथ गंधे याच्या पाठीचा मणका जन्मत:च वाकडा होता. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यावर उपचार करणे शक्य झाले नाही. मात्र आदिनाथ जसजसा मोठा हाेत गेला त्याला या वाकड्या मणक्याचा त्रास अधिक होऊ लागला. वारंवार पाठ दुखणे, चालताना उजवा पाय दुखणे, जास्त वेळ चालता येत नसे, थोडावेळ चालल्यावर बसावे लागत असे, अशा अनेक समस्यांचा त्याला सामना करावा लागत होता. वय वाढत होते. तसे त्रासही वाढू लागले. त्यामुळे अखेर २०१८ मध्ये आदिनाथने जालना येथील डॉक्टरांकडे उपचार सुरू केले. डॉक्टरांनी त्याला मणक्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असून, त्यासाठी दोन लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आदिनाथला शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. मात्र त्रास वाढत असल्याने काय करावे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला हाेता. जालन्यातील डॉक्टरांनी आदिनाथची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत त्याला मुंबईतील जे.जे. रुग्णालय, केईएम रुग्णालय किंवा नायर रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आदिनाथ पाच ते सहा वर्षांनंतर जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी आला. जे.जे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी आल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याच्या विविध तपासण्या केल्यावर त्याला जी.टी. रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले. जी.टी. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च येणार होता. यातील ९० हजार रुपये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मिळाले. मात्र उर्वरित ६० ते ७० हजार जमा करण्याचे मोठे आव्हान आदिनाथ समोर होते.

सामाजिक संस्थांकडून निधी उभारला

शस्त्रक्रियेसाठी आवश्यक पैसे उभे करण्याचे आव्हान आदिनाथ समोर असताना जी.टी. रुग्णालयातील समाजसेवा विभागातील अधिकारी विजय गायकवाड यांच्याशी त्याची भेट झाली. त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेत त्याला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांनी विविध सामाजिक संस्था, कंपन्या यांच्याकडून आदिनाथला लागणारे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिल्याने त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया मोठी असल्याने जवळपास तीन महिने आदिनाथ जी.टी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आले त्यावेळी त्याच्याकडे घरी जाण्यासाठी पैसे नसल्याने समाजसेवा विभागाने त्याचा घरी जाण्याचा खर्चही उचलला व त्याच्या घरी जाण्याची व्यवस्था केली.

ग्राफिक्स डिझाईनच्या अभ्यासक्रमाला प्रवेश

शस्त्रक्रियेसाठी समाजसेवा विभागातील अधिकारी विजय गायकवाड यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळेच मी व माझे कुटुंब आता आनंदात आहोत. दैनंदिन कामे नियमितपणे करत असून, सध्या ग्राफिक्स डिझाईन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असल्याचे आदिनाथ गंधे यांनी सांगितले.