मुंबई: बुलेट ट्रेनच्या गाड्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच त्या उभ्या करण्यासाठी एक मोठे आगार भिवंडी तालुक्यातील दोन गावांत होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागांकडून भूसंपादन १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आता त्या जमिनींचा ताबा घेण्याची प्रक्रिया हायस्पीड काॅर्पोरेशनकडून सुरू असून ३३ टक्के जमिनी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगाराचे कामही पुढे सरकरणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण १,३९६ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यामध्ये १,०२४.८६ हेक्टर खासगी आणि ३७१.१४ हेक्टर जमीन सरकारी आहे. महाराष्ट्रातील ४३३.८२ हेक्टर जमिनीचा यात समावेश आहे. आतापर्यंत राज्यात ७२ टक्के भूंसपादन झाले आहे. यामध्ये आगारांसाठीही भूसंपादन करण्यात येत आहे.