मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेला सातवा ७० मीटर लांबीचा स्टील पूल गुजरातमधील वडोदरा येथे उभारण्यात आला आहे. डेडिकेटेड फ्रेट काॅरिडाॅर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल) रेल्वे मार्गावर हा ६७४ मेट्रीक टन वजनाचा ‘मेक इन इंडिया” स्टील पूल उभारला आहे.

बुलेट ट्रेन मार्गावर आतापर्यंत ७ पूल उभे केले असून १०,००० मेट्रिक टनांपेक्षा जास्त वजनाचे हे पूल आहेत. वडोदरा येथे उभारण्यात आलेल्या पुलाची उंची १३ मीटर आणि रुंदी १४ मीटर असून ६७४ मेट्रीक टन वजनाचा स्टील पूल आहे. हा पूल कोलकत्यातील दुर्गापूर येथील कारखान्यात तयार करण्यात आला. तसेच या पुलाची उभारणी करण्यासाठी विशेष वाहनाद्वारे बांधकामस्थळी नेण्यात आला.

पुलाच्या निर्मितीत सुमारे २८,८०० टॉर-शियर प्रकारातील उच्च दर्जाचे आणि ताकदीचे (टीटीएचएस) बोल्ट्सचा वापर केला गेला. तसेच या पुलाचे आयुष्य १०० वर्षांपर्यंत राहील, अशाप्रकारणे रचना आणि अत्याधुनिक साहित्य वापरले आहे. पुलाची उभारणी करतेवेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसीसी) रेल्वे मार्गावर ब्लाॅक घेण्यात आले होते, असे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे सांगण्यात आले.बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गात नियोजित २८ स्टील पूल उभे केले जाणार आहेत.

यामधील नुकताच गुजरातमधील सातवा स्टील पूल उभा केला. याआधी सुरत, आणंद, वडोदरा आणि दादरा नगर हवेली येथील सिल्वासा येथे सहा स्टील पूल उभे केले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पात स्टीलच्या पुलाची उभारणी केली जात असल्याने, देशातील स्टील उद्योगाला लक्षणीय चालना मिळत असल्याचे मत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

बुलेट ट्रेन मार्गावर हे पूल उभारले- राष्ट्रीय महामार्ग ५३, सुरत, गुजरात येथे ६७३ वजनाचा आणि ७० मीटर लांबीचा स्टील पूल- भारतीय रेल्वेच्या वडोदरा-अहमदाबाद मुख्य मार्गिकेवर, नाडीयाड, गुजरात येथे १,४८६ मेट्रीक टन वजनाचा १०० मीटर लांबीचा स्टील पूल- दिल्ली-मुंबई राष्ट्रीय एक्सप्रेस वे, वडोदरा, गुजरात येथे ४,३९७ मेट्रीक टन वजनाचा २३० मीटर लांबीचा स्टील पूल- दादरा आणि नगर हवेलीमधील सिल्वासा येथे १,४६४ मेट्रीक टन वजनाचा १०० मीटर लांबीचा स्टील पूल- पश्चिम रेल्वेवर, वडोदरा, गुजरात येथे ६४५ मेट्रीक टन वजनाचा ६० मीटर लांबीचा स्टील पूल- डीएफसीसी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर, सुरत, गुजरात येथे १,४३२ मेट्रीक टन वजनाचा १६० मीटर लांबीचा स्टील पूल- डीएफसीसी रेल्वे मार्गावर, वडोदरा, गुजरात येथे ६७४ मेट्रीक टन वजनाचा ७० मीटर लांबीचा स्टील पूल

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन ५०८ किमीचा प्रकल्प असून या प्रकल्पाचे ११ टप्प्यात विभागणी केली आहे. यामध्ये ४६५ किमी लांबीचे व्हायाडक्ट (लांबलचक पूल), १२ स्थानके, १० किमीचे २८ स्टील पूल, २४ नदी पूल, ९७ किमी लांबीचा बोगदा तयार केला जाईल. राज्यात शीळफाटा ते गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत १३५ किमींचे काम करण्यात येत आहे. राज्यात ठाणे, विरार, बोईसर तीन स्थानकांची पायाभरणीचे काम सुरू आहे. बोईसर स्थानक हे पायाभरणी सुरू होणारे पहिले स्थानक आहे.