बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनाचे काम चांगलेच रखडले आहे. बाधित होणाऱ्या शेतजमिनी, शेतकऱ्यांचा विरोध, रहिवाशांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न प्रकल्प राबविणाऱ्या राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशनसमोर आहेत.

आतापर्यंत प्रकल्पातील एकूण १,४३४ हेक्टरपैकी अवघी ०.९ हेक्टर जमीनच मिळाली असून तीसुद्धा वांद्रे-कुर्ला संकुलातील शासनाची जमीन आहे. ही जमीन सोडता प्रकल्पातील अन्य कोणतीही जमीन संपादित झालेली नाही किंवा ताब्यात मिळालेली नाही.  एकूण १,४३४ हेक्टरपैकी खासगी जागा १०२२ हेक्टर आहे. सध्या जमिनींचे संयुक्त मोजणी सर्वेक्षण सुरू असून प्रकल्पातील ५०८ किलोमीटरपैकी ३५० किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दोन ते तीन महिन्यांत ३५० किलोमीटरचे संपादन केले जाईल, असा दावा कॉर्पोरेशनकडून करण्यात आला आहे. तरीही काही भागातून जमीन संपादनाला विरोध मावळलेला नाही.

सध्या गुजरातमधील काही भागांतील शेतकऱ्यांकडून विरोध होत असून तलासरी, नवसारी आणि डहाणूतील गावांमधून प्रकल्पाला मोठा विरोध आहे. या भागातील जमिनीचे संपादन अद्यापही झालेले नाही. बाधित होणाऱ्या शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विरोध होत असल्याने जमीन संपादित करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी गावोगावी ठाण मांडून आहेत. प्रकल्पासाठी १,४३४ हेक्टर जागा लागणार आहे.

प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण जागेपैकी ०.९ हेक्टर जागा आम्हाला मिळाली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील ही जागा सरकारची आहे. सध्या ५०८ किलोमीटरच्या या प्रकल्पातील ३५० किलोमीटर जमिनीचे संयुक्त मोजणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दोन ते तीन महिन्यांत या जमिनीचे संपादन पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.    – धनंजय कुमार, प्रवक्ता, राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन

पूर्ण झालेली कामे

*साबरमती हबसाठी निविदा *नवसारी येथे पुलाच्या कामासाठी निविदा *वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणे २१ किलोमीटरच्या बोगद्याचे सर्वेक्षण पूर्ण

Story img Loader