मुंबई : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) देशातील पहिल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील मुंबई आणि गुजरातमधील अहमदाबाद ही दोन महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण २४ नदी पूल उभारण्यात येत आहेत. यापैकी गुजरातमधील वात्रक नदीवरील दहावा पूल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे.
मुंबई – अहमदाबाददरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेटचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दीव – दमण येथे पायाभूत सुविधा उभ्या केल्या जात आहेत. तसेच वांद्रे – कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या १२ स्थानकांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पात एकूण २४ नदी पूल उभारण्यात येत आहेत. गुजरातमधील २० आणि महाराष्ट्रात चार नद्यांवर हे पूल उभारण्यात येणार आहेत. गुजरामधील अनेक नद्यांवरील पुलांची उभारणी झाली आहे. तर, गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील वात्रज नदीवर सुमारे २८० मीटर लांबीचा पूल उभारण्याचे काम बुधवारी पूर्ण झाले. यात ७ फूल स्पॅन गर्डर्स आहेत. या गर्डर्सना ९ ते १६ मीटर उंचीच्या भक्कम पिअर्सचा आधार दिला आहे. वात्रक पूल हा आनंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान आहे. वात्रक नदी आनंद बुलेट ट्रेन स्थानकापासून २५ किमी आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकापासून ३० किमी अंतरावर आहे. तसेच आनंद आणि अहमदाबाद या दोन स्थानकांदरम्यान मोहर नदीवर पूल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील पूर्णा, मिंधोला, अंबिका, वेंगानिया; वलसाड जिल्ह्यातील पार, औरंगा, कोलक; खेडा जिल्ह्यातील मोहर, वात्रक; वडोदरा जिल्ह्यातील धाधर या नद्यांवर पूल उभारण्यात आले आहेत. तर, नर्मदा, तापी, माही आणि साबरमती या महत्त्वाच्या नद्यांवरील पुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
हेही वाचा…बीकेसीतील पॉडटॅक्सीसाठी दक्षिणेतील दोन कंपन्या उत्सुक, लवकरच निविदा अंतिम होणार
वात्रक पुलाचे वैशिष्ट्ये
लांबी २८० मीटर
यात ७ फुल स्पॅन गर्डर (प्रत्येकी ४० मीटर)
पिअर्सची उंची – ९ मीटर ते १६ मीटर
३.५ मीटर व ४ मीटर व्यासाचे ८ गोलाकार खांब
ही नदी राजस्थानमधील डुंगरपूरच्या टेकड्यांवरुन उगम पावते आणि मेघराज तालुक्यातील मोयादी गावाजवळ गुजरातमध्ये प्रवेश करते.
© The Indian Express (P) Ltd