लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई-अहमदाबाद या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून आता प्रकल्पातील स्थानकांचे काम वेगाने केले जात आहे. गुजरातमधील पाच स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रातील तीन स्थानकांच्या कामाला सुरुवात झाली आहे. बोईसर, विरार स्थानकांची पायाभरणी सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमण येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. तर, गुजरातमध्ये आठ आणि महाराष्ट्रात चार अशा एकूण १२ स्थानके बांधण्यात येणार आहेत. त्यात, वांद्रे – कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. या सर्व स्थानकांची कामे सुरू असून ती वेगाने करण्याचा निश्चय करण्यात आला आहे, असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ( एनएचएसआरसीएल) वतीने सांगण्यात आले.

आणखी वाचा-Sanjay Raut : “मुंबई विमानतळावरचा शिवरायांचा पुतळा अदाणी आणि भाजपाने अडगळीत..”, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

बोईसर हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठे औद्योगिक उपनगर आहे. लवकरच या औद्योगिक उपनगराला बांधकामाधीन बोईसर बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडून चालना मिळणार आहे. बुलेट ट्रेन सुरू झाल्याने मुंबईच्या मध्यवर्ती भागातील वांद्रे – कुर्ला संकुल – बोईसरदरम्यानचा एकूण प्रवास ३६ मिनिटांत होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullet train project stations accelerated stations work in maharashtra started mumbai print news mrj