मुंबई: बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाच्या बस आगारांमधील उपहारगृहांची दुर्दशा झाली असून बस वाहक आणि चालकांना बसगाडीतच बसून जेवणाचा डबा खावा लागत आहे. वांद्रे आगारात अशाच एका गाडीत बसून जेवत असलेल्या बस चालक-वाहकांची ध्वनीचित्रफीत प्रसारित झाली असून या प्रकारामुळे बेस्ट वाहक – चालकांमुळे संताप व्यक्त होत आहे.
बेस्टच्या आगारांमध्ये सोयी – सुविधाची वानवा असल्यामुळे बेस्टच्या वाहक, चालक व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रसाधनगृह, विश्रांतीगृहची सुविधा नसल्याने वाहक – चालकांचे अतोनात हाल होत आहेत. उपहारगृह नसल्यामुळे वाहक आणि चालकांना जेवणाचा डबा खाण्यासाटी अनेकदा योग्य जागा मिळत नाही. विश्रांतीगृह नसल्याने मधल्या वेळेत विश्रांतीही घेता येत नाही. याबाबत यापूर्वी अनेकदा बेस्ट समितीमध्ये चर्चाही झाली आहे. मात्र त्यावर बेस्ट प्रशासनाने योग्य तोडगा काढलेला नाही. काही महिन्यांपूर्वी बेस्टने उपहारगृह चालवण्यासाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र कंत्राटातील जाचक अटींमुळे उपहारगृह चालवण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे बस आगारांमधील उपहारगृहांची दुर्दशा झाली. वांद्रे आगारात दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे येथील उपहारगृह चालविण्यासाठी कंत्राटदार तयार नाहीत. आगाराच्या दुरुस्तीमुळे येथील उपहारगृहात बसून जेवता येत नाही, अशी तक्रार काही वाहक व चालकांनी केली आहे. कर्मचाऱ्यांना दररोज बसगाडीत बसून जेवण करावे लागते. प्रशासनाला जाग यावी म्हणून कर्मचाऱ्यांनी ध्वनीचित्रफीत तयार केली आहे, असे एका कर्मचाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
हेही वाचा… केवळ एका अटीमुळे गिरणी कामगारांवर अपात्रतेची टांगती तलवर; म्हाडाकडून घर मिळणार की नाही…
दरम्यान, उपहारगृहांच्या कंत्राटाचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. एखाद्या आगारात गैरसोयी असल्याची त्याबाबत कर्मचाऱ्यांनी नोंदवहीत तक्रार करावी. या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमामधील जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.