मुंबई : ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात आला असून ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वेच्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच जम्बो ब्लॉकच्या वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. दरम्यान, हार्बर मार्गावरी लोकलही शुक्रवारी विलंबाने धावत होती. त्यामुळे वेळेवर कार्यालयात पोहोचण्यासाठी शुक्रवारी सकाळी अनेकांनी एनएमएमटी, तसेच राज्य परिवहन महामंडळच्या (एसटी) बसचा पर्याय निवडला. यामुळे सकाळपासूननच बसमध्ये प्रचंड गर्दी दिसत होती.
फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामांसाठी सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक घेतला आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते रविवार दुपारी १२.३० पर्यंत हा ब्लॉक असून या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते दादर आणि सीएसएमटी ते वडाळा लोकल बंद असतील.मात्र, रेल्वे उशीराने धावतील तसेच मेगाब्लॉकनुसार वेळापत्रक चालवले तर अनेक गाड्या रद्द होतील आणि कार्यालयात पोहोचायला उशीर होईल या गैरसमजातून हार्बर मार्गावरील अनेक प्रवाशांनी शुक्रवारी बसने प्रवास करणे पसंत केले. एनएमएमटीची पनवेल – दादर बस सेवा, तर राज्य परिवहन महामंडळाची पनवेल / उरण – दादर अशी बससेवा उपलब्ध आहे. दरम्यान, नेहमीच्या रेल्वे वेळापत्रकानुसार लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुक्रवारी कार्यालयात पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, गुरुवारी देखील सीएसएमटीकडून पनवेल,वाशीला जाणाऱ्या गाड्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना एक तासाऐवजी दीड तास प्रवास करावा लागला.