www.abhibus.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून देशभरातील कोणत्याही शहरांमधील बसची तिकीट खरेदी करता येणे शक्य होते. स्थानिक लोकांना ही सुविधा वापरता यावी म्हणून कंपनीने सहा भारतीय भाषांमध्ये सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे केवळ इंटरनेटचा वापर करणारी मंडळीच नव्हे तर नव्याने इंटरनेट वापर करणारी मंडळीही या सेवेचा फायदा घेऊ शकतात.
आज महिन्याला पंधरा ते वीस नवउद्योग बाजारात दाखल होत आहेत. ही संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत घटली असली तरी ती सातत्याने वाढणारी आहे. याचबरोबर अपयशी नवउद्योगांची संख्याही वाढू लागली आहे. अपयशाची अनेक कारणे आहेत. यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण जी सुविधा देत आहोत त्या सुविधेसाठी बाजार तयार नसणे. आपण जी सुविधा देऊ करणार आहोत त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे व नंतर उद्योग सुरू करणे अशा मानसिकतेतून अनेक जण तयारी करत असतात. असाच प्रवास अभिबस डॉट कॉम या संकेतस्थळाचा संस्थापक सुधाकर रेड्डी याने केला. अण्णामलाय विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:चा काहीतरी व्यवसाय करायचा सुधाकरच्या मनात होते. यामुळे त्यांनी ऑनलाइन बस तिकीट विक्री कशी करता येईल यावर विचार करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस रेडबसची नुकतीच सुरुवात झाली होती. सुधाकरने विविध बस व्यवस्थापन कंपन्या तसेच सरकारी बस सेवा पुरविणाऱ्या यंत्रणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला. या संवादामध्ये त्याच्या असे लक्षात आले की ही सेवा ऑनलाइन करण्यासाठी आवश्यक अशी यंत्रणा यापैकी कोणाकडेच नाही. मग आपण या सर्व यंत्रणांना तशी सुविधा उपलब्ध करून देऊन त्यानंतर व्यवसाय सुरू करणे योग्य ठरेल असे सुधाकरने ठरविले आणि त्याने या सर्व यंत्रणांना ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक असे सॉफ्टवेअर विकसित करून देण्यास सुरुवात केली. तो काळ साधारणत: २००८चा होता. त्या वेळेस सर्वत्र डिजिटायजेशनची प्रक्रिया मंदगतीने सुरू होती. यामुळे त्याने विकसित केलेले सॉफ्टवेअर सरकारी यंत्रणांबरोबरच विविध खासगी कंपन्यांनीही विकत घेतले. यामुळे त्याच्या व्यवसायाचा पाया तयार झाला. यानंतर २०१३ मध्ये त्यांनी www.abhibus.com या व्यासपीठावरून ऑनलाइल तिकीट विक्रीस सुरुवात केली.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून देशभरातील कोणत्याही शहरांमधील बसची तिकीट खरेदी करता येणे शक्य होते. स्थानिक लोकांना ही सुविधा वापरता यावी म्हणून कंपनीने सहा भारतीय भाषांमध्ये सेवा उपलब्ध करून दिला आहे. यामुळे केवळ इंटरनेटचा वापर करणारी मंडळीच नव्हे तर नव्याने इंटरनेट वापर करणारी मंडळीही या सेवा फायदा घेऊ शकतात. यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणच्या बसचे तिकीट खरेदी करू शकता. तुम्ही प्रवास सुरू करण्याचे व गंतव्य स्थान दिल्यावर त्या मार्गावर चालणाऱ्या सर्व बस सेवांची माहिती आपल्यासमोर येते. यात बसचालक कोण आहे इथपासून ते इतर प्रवाशांनी त्या बस कंपनीला काय गुण दिले आहेत याचा तपशील आपल्याला मिळतो. आपण निवडलेल्या बस कंपनीच्या बसमध्ये कोणती आसने उपलब्ध आहेत याचा तक्ता आपल्या डोळ्यासमोर येतो व त्यात आपल्याला पाहिजे ते आसन आपण निवडू शकतो. हे आसन निवडल्यावर पैसे भरून काही सेकंदांत आपण आपले तिकीट मिळवू शकतो. याशिवाय या सेवेची खासियत म्हणजे कंपनीने एक अॅप विकसित केले असून हे अॅप बसमध्ये हॉटस्पॉटवरून जोडणी केल्यानंतर सुरू होते. यात तुम्हाला ५०हून अधिक चित्रपटांचे पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या प्रवासात चित्रपटाचा आनंदही लुटू शकता. बस कंपन्यांच्या दृष्टीनेही उपयुक्त अशा अनेक सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत. यात बस कंपनीला एका बसमध्ये किती प्रवासी आहेत त्या प्रवाशांची यादी देण्यात येते. या यादीच्या माध्यमातून प्रवाशांना बस कुठे आहे, त्यांच्या ठिकाणी किती वाजता येणार आहे याबाबतचा तपशील पाठविणे शक्य होते. याचबरोबर यामध्ये ‘ऑन स्पॉट तिकीट’ विक्रीची सुविधा आहे. म्हणजे जर बसमध्ये काही आसने रिक्त असतील तर चालक आयत्या वेळी अॅपच्या माध्यमातून रिक्त आसनाची विक्री करू शकतो. जेणेकरून कंपन्यांना आयत्या वेळी येणारे प्रवासी घेणेही शक्य होते. यातील या खास सुविधांमुळे अल्पावधीत हे अॅप या क्षेत्रात दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. आजमितीस या अॅपच्या माध्यमातून दिवसाला ५० हजार तिकिटांची विक्री होते.
गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत
कंपनीची सुरुवात करताना आपल्या नातेवाईकांकडून १५ लाखांचे बीजभांडवल उभे करून सुधाकरने काम सुरू केले. यानंतर त्यांनी काही गुंतवणूकदारांकडून निधी उभारला. कंपनी पुरवीत असलेली सॉफ्टवेअर सेवा व तिकीट विक्री झाल्यानंतर संबंधित कंपन्यांकडून मिळणारा मोबदला हे या कंपनीचे मुख्य उत्पन्नस्रोत आहे.
भविष्यातील संधी
आजमितीस देशात रोज ३५ हजार बसगाडय़ा धावतात. यात तब्बल १४ लाख आसने आहेत. यापैकी सरासरी ७० टक्के आसने रोज भरतात. यापैकी केवळ दीड लाख लोकच ऑनलाइन तिकीट खरेदी करतात. यामुळे या बाजारात मोठी संधी आहे. सध्या ऑनलाइन तिकीट खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या दीड लाखाहून पाच ते सहा लाखांवर नेण्याचा पुढील पाच वर्षांमध्ये प्रयत्न असेल. आमच्यासाठी दिवसाला दोन लाखांपर्यंतचे उद्दिष्ट समोर असल्याने सुधाकरने सांगितले.
नवउद्यमींना सल्ला
आपल्याला चांगली कल्पना सुचली म्हणजे आपण नवउद्योग सुरू करू शकतो असे नाही. कारण कोणत्याही उद्योगात १५ टक्केच भाग संकल्पनेचा असतो. उर्वरित भाग हा संकल्पना कशी प्रत्यक्षात आणतो याचा असतो. यामुळे संकल्पना प्रत्यक्षात कशी येणार याबाबत पुरेपूर विचार करून मगच नवउद्योगाचा निर्णय घ्या, असा सल्ला सुधाकरने दिला आहे. याचबरोबर उद्योगासाठी निधी उभा करणे हे मोठे आव्हान असते. हे आव्हान पेलण्यासाठी तुम्ही तयार असणे आवश्यक असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
@nirajcpandit