प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे धनार्जनाचे मार्ग पूर्णपणे बंद झालेल्या ‘बेस्ट’ची आíथक घडी सुधाण्यासाठी प्रशासनाकडून कैक पर्याय चाचपडून पाहिले जात आहे. यात दुरुस्तीच्या खर्चाला ब्रेक लावण्यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वातानुकूलित आणि साध्या गाडय़ा भाडे तत्त्वावर घेण्याचा विचार केला जात आहे. प्रति किलोमीटरच्या हिशोबाने या बस गाडय़ा घेतल्या जाणार असून येत्या काही महिन्यांत यासंदंर्भात निविदा काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सध्या बेस्टच्या ताफ्यात ३ हजार ९९१ बस गाडय़ा आहेत. यापकी २ हजार ८१० सीएनजीवर तर एक हजार १८१ बस गाडय़ा डिझेलवर चालतात. मात्र यांतील सुमारे १८१ बस गाडय़ांची अवस्था वाईट आहे. त्यात किमान २०१७ पर्यंत तरी नव्या गाडय़ा बेस्टच्या ताफ्यात येणे अशक्य आहे. काही महिन्यांवर पावसाळा ठेपला आहे, यात प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी बेस्ट प्रशासनाने बस गाडय़ा भाडे तत्त्वावर घेण्याचा विचार केला असल्याचे सांगण्यात आले.
‘बेस्ट’च्या खर्चाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गाडय़ांच्या दुरूस्तीवर होणारा खर्च अधिक असल्याचे पाहायला मिळते. यात भाडे तत्त्वावर गाडय़ा घेतल्यास दुरुस्तीच्या खर्चाच्या रक्कमेत बचत होईल. त्यामुळे बेस्ट अशा गाडय़ा खासगी संस्थेतर्फे घेण्याचा विचार करत असल्याचे सांगितेले जात आहे.
भाडे तत्त्वावरील गाडय़ा फायदेशीर!
मुंबईसारख्या शहरात बस गाडी भाडे तत्त्वावर घ्यायची झाल्यास एक किलोमीटरसाठी ३७ ते ४० रुपये मोजावे लागतील. अशा प्रकारच्या गाडय़ा कमाल १८० किलोमीटर चालवणे आवश्यक असते. यात बेस्टची एक गाडी कमाल २१० किलो मीटर तर किमान १८० किलो मीटर धावत असते. त्यामुळे हा पर्याय फायदेशीर असल्याचे जाणकार सांगतात.
भाडे तत्त्वावर बस गाडय़ा घेण्याचा विचार करण्यात आला आहे. तांत्रिक बाबी तपासून निविदा प्रक्रियेने अशा बस गाडय़ा घेण्यात येतील. यामुळे बेस्टच्या सध्या होणारया खर्चात बचत होईल, असे दिसते. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि खर्चातही बचत करण्यासाठी अशा प्रकारे उपाययोजना करणे आवश्यक आहेत.
-जगदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा