मुंबईः जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याच्या आमिष दाखवून व्यावसायिकाची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पायधुनी परिसरात घडला. तोतया अबकारी व पोलीस अधिकाऱ्यांमार्फत मुख्य आरोपीने ही फसवणूक केली. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करीत आहेत.

व्यावसायिक वकास शेख (३६) ठाण्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी अशोक गायके व अनिल बागुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, आरोपी गायकेने २०२३ मध्ये तक्रारदारासोबत ओळख केली. त्यावेळी सोन्याचा दर प्रतीतोळा ६० हजार रुपये होता. मात्र आरोपीने त्यांना प्रतीतोळा ५२ हजार रुपये दराने सोने देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी अनिकेत बागुल याला अबकारी अधिकारी व अनिकेत नावाच्या व्यक्तीला वाशिंद येथील पोलीस अधीक्षक असल्याचे भासवले.

जप्त केलेले सोने सोडवण्याच्या बदल्यात सोने देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. त्यासाठी तक्रारादाराकडून सव्वा कोटी रुपये घेण्यात आले. ८ जून ते सप्टेंबर २०२३ या काळात ही रक्कम घेण्यात आली. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४०६ (फौजदारी विश्वासघात) व ३४ (सामायिक गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader