मुंबई : एका वित्तीय कंपनीच्या वसुली एजंटकडून होणाऱ्या छळवणुकीला कंटाळून कांदिवली येथील २७ वर्षीय व्यवसायिकाने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी कूरार पोलिसांनी वसुली एजंट विजय ओहाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, व्यावसायिक वाहनाच्या कर्जाच्या हप्त्याच्या थकबाकीसंदर्भात ओहाळने त्याला छळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> शेत जमिनीतील वाढते प्रदूषक रोखणाऱ्या जीवाणूंचा शोध; आयआयटी मुंबईतील संशोधकांमुळे जमीन होणार सुपीक
प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील मूळ रहिवासी असलेल्या सूरज अमृतलाल जयस्वाल यांनी मंगळवारी कांदिवली (पूर्व) येथील गोकुळ नगरमधील त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. जायस्वाल यांचे मोठे बंधू सुनील जायस्वाल(४०) यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, त्यांच्या भावाने तीन व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले होते. आर्थिक अडचणींमुळे जायस्वाल एक वाहनाचा मासिक हप्ता भरू शकले नाहीत; त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात विजय ओहाळ त्याला वारंवार फोन करून हप्ते भरण्यासाठी छळत होता. मी त्या कर्जाचा जामीनदार असल्यामुळे ओहाळ मलाही फोन करीत होता आणि माझ्या भावाशी बोलायला सांगत होता, असे सुनील यांनी पोलिसांना सांगितले. नंतर सूरज आणखी एका हप्त्याचा भरणा करू शकला नाही, त्यामुळे ओहाळने पुन्हा त्याला फोन करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा >>> प्रदूषण करणाऱ्या दोनशेहून अधिक झोपु प्रकल्पांना नोटिसा; उल्लंघन सुरू राहिल्यास बांधकामांना स्थगिती
तुमचा भाऊ फोन उचलत नाही, असे वारंवार फोन करून तक्रारदाराला सांगण्यात येत होते. माझा भाऊ कर्जाचे हप्ते भरण्यास असमर्थ आहे. त्यामुळे वित्तीय कंपनीने वाहन जप्त करावे, असे सुनील यांनी त्यांना सांगितले. ओहाळने ३१ डिसेंबर रोजी संबंधित वाहनाची कागदपत्रे घेतली. त्याच दिवशी माझ्या भावाने आत्महत्या केली. ओहाळ वारंवार माझ्या भावाला फोन करून छळत होता. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले, असे सुनील यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओहाळविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.