उल्हासनगर भागातील व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी तिघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली असून, या व्यापाऱ्यास उधारीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन महिलांनी चार लाखांची सुपारी देऊन त्याची हत्या केल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे.
उल्हासनगर भागात राहणारे राजा ओतानी यांचा मृतदेह अंबरनाथ येथील एमआयडीसी परिसरात आढळला होता. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. या घटनेप्रकरणी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त बी.जी. यशोद, पोलीस निरीक्षक उत्तम सांगळे यांच्या पथकाने तपास करून या प्रकरणी बबिता लाभाना, प्रिया आयलानी, आकाश मेंदन या तिघांना अटक केली. तसेच या प्रकरणातील आरोपी राजेश तरूर हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजा ओतानी यांच्याकडून बबिता हिने एक लाख, तर प्रिया हिने आठ लाख रुपये उधारीने घेतले होते. हे पैसे परत मिळावेत, यासाठी राजा यांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे या दोघी संतप्त झाल्या होत्या. त्यामुळेच पैसे परत द्यावे लागू नयेत, यासाठी दोघींनी राजेश याला चार लाखांची सुपारी दिली. बबिताकडील पैसे घेण्यास ये, असा निरोप त्याला देण्यात आला होता. त्यानुसार तो गेला असता राजेश आणि आकाश या दोघांनी त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader