मुंबई: केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून तोतयाने चेंबूर येथील अमर महल पुलावर बंदुकीच्या धाक दाखवून रोख रक्कम व कागदपत्रे असलेली बॅग लुटल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात तोतयागिरी करणे, जबरी चोरी व भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांबरोबरच गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे.
उद्योगपती धीरज वाधवान यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणारा पंकज उमाशंकर सिंह (३५) आणि चालक विनोद मोरे कामानिमित्त मंगळवारी चर्चगेटला जात होते. त्यावेळी चेंबूर येथील अमर महल पुलावर एका होन्डा सिटी मोटरगाडीने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून एक व्यक्ती बाहेर पडली. त्याने बंदुकीचा धाक दाखवून आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सिंह यांना सांगितले. कारवाई करण्याचा धाक दाखवून त्याने विनोद मोरेचा मोबाइल काढून घेतला.
हेही वाचा… शालेय स्तरावर ‘कोचिंग सेंटर’ बंद! केंद्र सरकारच्या नियमावलीमध्ये महत्त्वाची तरतूद
सिंह यांचे दोन मोबाइलही त्याने काढून घेतले. त्यानंतर सिंह यांच्याकडील रोख दीड लाख रुपये असलेली बॅगही घेतली. याशिवाय अन्य एक निळ्या रंगाची बॅगही घेतली. त्या बॅगेत तक्रारदाराचे पाकिट, धीरज वाधवान यांची न्यायालयीन कागदपत्रे, त्यांच्या मुलीचे म्युच्युअल फंडची कागदपत्रे होती. तक्रारीनुसार एकूण दोन लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून बंदुकीच्या धाकावर हिसकावून नेला. सुरुवातीला तक्रारदारांना ती सीबीआयची कारवाई असल्याचे वाटले. पण तपासणीत ती व्यक्ती तोतया असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सिंह याने बुधवारी टिळक नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी तोतयागिरी करणे, जबरी चोरी व भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी वापरलेल्या मोटरगाडीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याशिवाय एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून सिंह व मोरे यांना लुटले. त्यावेळी दुसरा व्यक्ती मोटरगाडीमध्ये बसली होती, अशी माहिती तक्रारदाराने पोलिसांना दिली. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांबरोबर गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे.