ग्रामीण भागात जास्तीत जास्त डॉक्टर यावेत यासाठी त्यांना अनेक सवलती आणि सुविधाही देण्यात येत आहेत. मात्र सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही डॉक्टरच मिळत नाहीत, त्याला मी काय करू, असा उद्विग्न सवाल खुद्द आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सोमवारी विधानसभेत केल्याने सारे सभागृह अवाक झाले. त्यानंतर मात्र सारवासारव करताना राज्यात लवकरच १९०० डॉक्टरांची भरती करण्यात येणार असून सर्व डॉक्टरांच्या पगारातही भरीव वाढ करण्यात येणार असल्याची माहिती देत शेट्टी यांनी वेळ मारून नेली.
ठाणे जिल्हयातील दोन आदिवासी महिलांचा प्रसुतीदरम्यान झालेल्या मृत्यूबाबत विवेक पंडित यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आरोग्यमंत्री आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुंबई आणि परिसरात साइड पोस्टिंगवरील १४० डॉक्टरांच्या येत्या सात दिवसांत ठाणे जिल्हयात नियुक्त्या करण्यात येतील, तसेच पालघरचे उपजिल्हा रुग्णालय आता १०० खाटांचे करण्यात येईल अशी घोषणा शेट्टी यांनी केली.
मात्र राज्यात सध्या डॉक्टरांची ४५०० पदे रिक्त आहेत. कमी पगार आणि सुविधांच्या अभावामुळे डॉक्टर सरकारी नोकरीत येत नाहीत. ग्रामीण भागात डॉक्टरच नसल्यामुळे लोकांचे हाल होत असून आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. त्यावर अस्वस्थ आरोग्य मंत्र्यांनी आपण केलेल्या कामाचा पाढाच वाचला. गेल्या तीन वर्षांत सातत्याने डॉक्टरांची भरती करण्यात येत असून त्यांना वेतनावाढ तसेच चांगला पगारही दिला जात आहेत. अनेक सोयी-सवलती देऊनही भरती प्रक्रियेत निवड झालेल्यांपैकी ५० टक्केच डॉक्टर प्रत्यक्षात सेवेत रुजू होतात, असे शेट्टी यांनी सांगितले.
विरोधकांनी धारेवर धरताच डॉक्टरांच्या वेतनात वाढ करण्याबाबत विचार सुरू असून लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून विनाकारण गैरहजर असलेल्या ४५० डॉक्टरांची सेवा समाप्त करण्यात येणार असून येत्या आठवडाभरात ही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
डॉक्टरच मिळत नाहीत, तर मी काय करू..?
ग्रामीण भागात जास्तीत जास्त डॉक्टर यावेत यासाठी त्यांना अनेक सवलती आणि सुविधाही देण्यात येत आहेत. मात्र सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही डॉक्टरच मिळत नाहीत, त्याला मी काय करू, असा उद्विग्न सवाल खुद्द आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सोमवारी विधानसभेत केल्याने सारे सभागृह …
First published on: 16-07-2013 at 02:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: But what i should do if doctor not found