मुंबई/ नागपूर / पुणे : गुढीपाडव्यानिमित्त बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येत असून बांधकाम, वाहन, सराफा आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. यंदाचा गुढीपाडवा हा मालमत्ता विकासकांसाठी दशकातील सर्वोत्तम ठरण्याची चिन्हे आहेत. अधिकाधिक घर खरेदीदारांनी यानिमित्ताने आकर्षित करावे यासाठी विकासकांनी अनेक सूट-सवलती देऊ केल्या आहेत आणि त्यांना अपेक्षित प्रतिसादही मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घर खरेदीदारांना वर्षाच्या या समयी सर्व नोंदणीचे सोपस्कार व कागदपत्रांच्या पूर्ततेत मदत करणे यांसारख्या विशेष सुविधा विकासक देत असतात. यामुळे गुढीपाडव्यादरम्यान घरखरेदी ही सुलभ होण्यासह, काही लाखांमध्ये सवलतींचा लाभही घरइच्छुकांना मिळविता येतो. विशेषत: मुंबई व उपनगरांसह, मुंबई महानगर क्षेत्रांतील अनेक विकासकांनी ६ एप्रिल ते ९ एप्रिल या मर्यादित कालावधीत ऑन-साइट घर आरक्षणावर, मुद्रांक शुल्क संपूर्ण माफ किंवा सूट यांपासून ते अनेक गृहोपयोगी वस्तू व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे मोफत देऊ केल्या आहेत.

खरेदीदारांतील उत्साहासंबंधी बोलताना, ‘नरेडको’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रशांत शर्मा म्हणाले, संभाव्य खरेदीदारांना अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आणि स्व-मालकीच्या घराबाबत त्यांच्या आकांक्षेला वास्तवात आणण्यासाठी गुढीपाडव्यासारखे मुहूर्त ही निश्चितच चांगली संधी आहे. मात्र सूट-सवलतींच्या मोहात केवळ न फसता घर-इच्छुकांना माहितीपूर्ण व सूज्ञतेने निर्णय घेण्यासही आम्ही प्रोत्साहित करत असतो. शर्मा यांच्या मते, विक्रीत विशेषत: प्रशस्त दोन बीएचके आणि अधिक आलिशान श्रेणीतील घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि निवासी मालमत्तांच्या नोंदणीत मोठी वाढ दिसून येत आहे.

हेही वाचा >>>सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा

निवासी मालमत्तांविषयक संशोधन व सल्लागार संस्था अॅनारॉकचे समूहाचे अध्यक्ष अनुज पुरी यांच्या मते, २०२४ सालात नवीन निवासी मालमत्तांची विक्री आणि पुरवठ्यातही मुंबई, पुण्यासारख्या राज्यांतील महानगरांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत दिसला नव्हता तसा उत्साह दिसून येत आहे. त्याचे समर्पक प्रतिबिंब या दोन्ही शहरांच्या महानगर पालिकांकडील नवीन घरांच्या नोंदणीची संख्या आणि राज्याच्या मुद्रांक शुल्क महसुलातही उमटलेले दिसून येईल.

नागपुरातील वाहन, सराफा बाजारात गर्दी

गुडीपाडव्यानिमित्त नागपूर जिल्ह्यात विद्याुत वाहनांसाठी दुप्पट मागणी नोंदवली जात आहे. जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये गुडीपाडव्यानिमित्त सुमारे १ हजार विद्याुत वाहनांसह पाचशेच्या जवळपास पेट्रोल दुचाकींची नोंदणी झाली आहे. चारचाकी वाहनांमध्ये सुमारे ५०० पेट्रोल, १०० डिझेल तर १०० विद्याुत वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. सोन्याचे दर बघता दागिण्यांसाठी गुडीपाडव्याच्या पूर्वीच मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली. त्यातून सुमारे २०० कोटींचा व्यवसाय झाल्याचा अंदाज नागपुरातील रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी वर्तवला.

पुणेकरांचा वाहन खरेदीचा उत्साह अधिक

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकर वाहन खरेदीसाठी उत्सुक असून, अनेक वाहन खरेदी केंद्रांत प्रतीक्षा टाळण्यासाठी ग्राहकांनी आगाऊ बुकिंग केले आहे. यंदा विक्रीत १५ ते २० टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुचाकी विक्रीत वाढ अपेक्षित आहे, अशी माहिती कोठारी व्हील्सचे रूपेश कोठारी यांनी दिली. यंदा ई-वाहनांपेक्षा पेट्रोल वाहनांकडे ग्राहकांचा कल असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

खरेदीसाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी आमच्याकडे मार्च अखेरीपासूनच चौकशी सुरू झाली. चारचाकी आणि दुचाकी दोन्ही प्रकारच्या वाहनांना चांगली मागणी असून, वाहनविक्रीसाठी हा महिनाभर चांगले वातावरण राहील, असे बी. यू. भंडारी ऑटोमोटिव्हचे शैलेश भंडारी यांनी सांगितले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर वर्षीप्रमाणे यंदाही गृहखरेदीकडे कल कायम आहे. वर्षभराचा ग्राहक कल पाहिला, तर या वयोगटातील सुमारे ४५ टक्के ग्राहकांचा गृहखरेदीकडे कल असतो, असे दिसून आले आहे, अशी माहिती क्रेडाई संघटनेच्या महाराष्ट्र विभागाचे जनसंपर्क निमंत्रक कपिल गांधी यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buying a house on the occasion of gudi padwa 2024 amy