जिल्हा परिषदांच्या २०० जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

मुंबई : आरक्षणाच्या ५० टक्के  मर्यादेचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयाने सहा जिल्हा परिषदांमधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) सदस्यांची निवड रद्द के ल्याने रिक्त झालेल्या २०० जागा खुल्या वर्गातून भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पोटनिवडणुकीचा कार्यक्र म जाहीर केला. ओबीसींच्या वाटय़ाच्या जागा खुल्या वर्गातून भरल्या जाणार असल्याने ओबीसी नेत्यांमध्ये संतप्त प्रतिक्रि या उमटली आहे.

नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि पालघर या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ४४ पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या वर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील जागांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून घेण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच ओबीसींचे राजकीय आरक्षण तूर्त रद्द के ले असून, डॉ. के. कृष्णमूर्ती विरुद्ध केंद्र शासन प्रकरणात घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन केल्यानंतरच हे आरक्षण लागू होईल, असे स्पष्ट के ले आहे.  तसेच सहा जिल्हा परिषदांमधील ८५ निवडणूक विभाग आणि ३७ पंचायत समित्यांमधील १४४ निर्वाचक गणांमधील ओबीसी जागांसाठी झालेल्या निवडणुका रद्द करण्याचा आणि या रिक्त जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याबाबत दोन आठवडय़ांच्या आत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात आली असून, साप्ताहिक बाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची उपलब्धता या निकषांच्या आधारे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या पाच जिल्ह्यांचा स्तर- १ मध्ये समावेश झाला आहे. पालघर जिल्ह्याचा अद्यापही स्तर-३ मध्ये समावेश आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांतील रिक्त पदांच्या निवडणुका वगळता अन्य ५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, त्या तेथील करोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी स्पष्ट केले.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

* नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम या जिल्ह्य़ांमधील जिल्हा परिषदेच्या ७० तर पंचायत समितीच्या १३० जागांसाठी पोटनिवडणूक.

* या सर्व २०० जागा आता खुल्या वर्गातून भरण्याची प्रक्रिया.

* १९ जुलैला पोटनिवडणूक तर २० जुलैला मतमोजणी.

* २९ जून ते ५ जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत.

ओबीसी नेत्यांची २६, २७ जूनला परिषद

मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व पुढील रणनीती ठरविण्यासाठी २६ आणि २७ जून रोजी लोणावळा येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवर यांनी ही माहिती दिली. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे, शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader