‘श्याम बसुरियाँ बजायें..’ हा दादरा, ‘सलोना सा साजन है और मैं हूँ.’ ही गझल, ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा अभंग आणि ‘चांदणे शिंपीत जाशी’ हे गाजलेले मराठी गाणे अशी वैविध्यपूर्ण गाणी आपल्या खास शैलीत सादर करून शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आजच्या आघाडीच्या गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुमधुर सुरांनी दिवाळीची पहाट बहरली आणि रसिकश्रोते या सुरांमध्ये अक्षरश: न्हाऊन निघाले.
श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘गगन सदन तेजोमय’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक होता.
यंदाच्या दिवाळी पहाटचे खास आकर्षण आजच्या आघाडीच्या शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन हेच होते.  कौशिकी चक्रवर्ती यांनी दोन मराठी गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘उंबरठा’ चित्रपटातील ‘गगन सदन तेजोमय’ या गाण्यावर दीपाली विचारे यांच्या नृत्यसमूहाने नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर कौशिकी चक्रवर्ती यांनी ‘श्याम बसुरियाँ बजाएँ, चाहे जो वो सुन पाएँ’ हे गाणे सादर केले. त्याला उत्तम साथसंगत लाभली ती हार्मोनियम, तबला, गिटार आणि बासरीची. मूळ आशा भोसले यांनी गायलेली ‘सलोना सा साजन है और मैं हूँ’ ही गझल आपल्या खास शैलीत सादर करताना कौशिकी यांनी घेतलेल्या जागा आणि खास करून बोल ताना ऐकताना रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून ‘क्या बात है’ म्हणत उत्स्फूर्त दाद दिली. संत तुकारामांची ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटा वरी ठेवूनिया’ ही मराठी अभंगरचना सादर करून कौशिकी चक्रवर्ती यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. आयोजकांकडून ‘चांदणे शिंपीत जा’ हे गाजलेले गाणे गाण्याची मागणी करण्यात आल्यावर ते गाणेही त्यांनी ताकदीने सादर केले. त्यानंतर त्यांनी ‘जय जय जग जननी देवी’ हे काली माँचे द्रूतलयीतील भजन आणि आपली मातृभाषा बंगालीतील एक अस्सल गाणे सादर करूनही रसिकांना आपल्या वैविध्यपूर्ण गायकीचा आनंद दिला.
गोव्याच्या गायिका निशा पारसनीस यांनी बाकीबाब बोरकरांची ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ ही कविता  आपल्या खास शैलीत गीत स्वरूपात सादर केली. त्याचबरोबर ‘आल्यावरी जवळ मला घ्याल का’ ही द्रूतलयीतील बैठकीची लावणी  सादर केली आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  सारेगमपफेम विश्वजीत बोरवणकर आणि मधुरा कुंभार या नव्या दमाच्या गायकांनी सादर केलेल्या  ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दिस झाले मन हो पाखरू होऊन’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ यासारखी अनेक गाणी सादर करून रसिकांचे स्मरणरंजन केले.
यावेळी श्रीसिद्धिविनायक न्यासातर्फे नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जयंत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना ‘श्रीसिद्धिविनायक वाल्मिकी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार दिल्याबद्दल आभार मानल्यानंतर पाडगावकर यांनी ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे’ ही कविता वाचून दाखवली आणि रसिकांची दाद मिळवली. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जय देशमुख यांना तर द्रोणाचार्य पुरस्कार चेंबूर गावठाण येथील सर्वात जुन्या पवनपुत्र व्यायाम मंदिरचे सतीश पाठारे यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात कार्यरत वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे हरिश धनावडे यांनाही पुरस्कार देण्यात आला. स्वत: एचआयव्ही बाधित असूनही एचआयव्हीची बाधा झालेल्या लहान मुलांचा सांभाळ समाजाशी लढा देत करणाऱ्या ज्योती पाटील यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गाणी, पुरस्कार, नृत्याविष्काराबरोबरच कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये विनोदी कार्यक्रम सादर करून रसिकांची हसवणूक करण्याचा मान सुनील तावडे, भूषण कडू, अभिजीत चव्हाण, आशिष पवार, शर्मिष्ठा राऊत, शैला कणेकर यांनी मिळविला.
विनोद पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘गगन सदन तेजोमय’ या कार्यक्रमाचे संहिता व दिग्दर्शन आशिष पाथरे यांनी केले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा