लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मुंबईकरांना घराजवळच वैद्यकीय उपचार मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’ची संख्या वर्षअखेरपर्यंत २५० पर्यंत वाढविण्याचा निर्धार मुंबई महानगरपालिकेने केला आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेने १५९ ‘आपला दवाखाने’ सुरू केले असून, या दवाखानांमध्ये आतापर्यंत १० लाख नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४४ ‘आपला दवाखान्यां’चे लोकार्पण करण्यात आले होते. ‘आपला दवाखान्यां’ना वाढता प्रतिसाद मिळत असल्याने अवघ्या काही दिवसांतच महानगरपालिकेने त्यात वाढ करून मुंबईमध्ये ६६ दवाखाने सुरू केले. २६ जानेवारी २०२३ च्या पूर्वसंध्येला ‘आपला दवाखान्यां’ची संख्या १०० इतकी होती. तोपर्यंत या दवाखान्यांमध्ये दोन लाख नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेतले होते.

आणखी वाचा-मुंबई: पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी प्रत्येक विभागात नियंत्रण कक्ष

मुंबईतील अधिकाधिक नागरिकांपर्यंत ‘आपला दवाखाना’ पोहोचविण्याचा संकल्प महानगरपालिकेने सोडला असून जागतिक आरोग्य दिनी म्हणजे ७ एप्रिल रोजी मुंबईकरांच्या सेवेसाठी नवीन ४४ दवाखान्यांचे उद्घाटन करण्यात आले त्यामुळे ‘आपला दवाखान्यां’ची संख्या १५१ इतकी झाली. यामध्ये संपूर्ण मुंबई महानगरात २४ पॉलिक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक केंद्र आहेत. तर १२७ दवाखाने आहेत. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या ‘आपला दवाखाना’ या केंद्रामध्ये फिजिओथेरपी व नेत्र चिकित्सा सुविधा, मानसिक विकारांची पडताळणी करणारी मनशक्ती क्लिनिक सेवा आणि १८ वर्षे वयावरील नागरिकांची दंत तपासणी असे वेगवेगळे उपक्रमही सुरू करण्यात आले आहेत. सुरूवातीच्या महिन्यांच्या तुलनेत ‘आपला दवाखान्यां’मधील सरासरी लाभार्थींच्या संख्येत आता लक्षणीय वाढ झाली आहे. ‘आपला दवाखान्या’त आतापर्यंत १० लाख ४ हजार ९१२ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. रुग्णांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन महानगरपालिकेने ‘आपला दवाखान्यां’ची संख्या वर्षअखेरीस २५० पर्यंत नेण्याचा निर्धार केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: By the end of the year the number of aapla davakhanas will reach 250 mumbai print news mrj