लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : तीन जागा जिंकून ‘मुंबईत आवाज ठाकरें’चा हे शिवसेना (उबाठा) पक्षाने सिद्ध केले. काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली. ठाण्यातील चारपैकी तीन जागा जिंकून महायुतीने वर्चस्व कायम राखले. वायव्य मुंबई मतदारंसघातून शिवसेना शिंदे गटाचे रविंद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्याने एका आघाडीला कौल देण्याची मुंबईची परंपरा कायम राहिला आहे. ठाण्यात चारपैकी तीन जागा महायुतीने जिंकल्या आहेत.
दक्षिण मुंबईत अपेक्षेप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी जागा कायम राखली. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून अनपेक्षितपणे शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी विजय संपादन केला. देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा ५३ हजार मतांनी पराभव केला. मुंबई-मराठी गुजराती वाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाने वादग्रस्त ठरलेल्या ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी भाजपचे मिहिर कोटेचा यांचा ३० हजार मतांनी पराभव केला. उत्तर मुंबईतून भाजपचे पियूष गोयल हे ३ लाख ५७ हजार विक्रमी मतांनी विजयी झाले. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम यांचा १६,१५४ मतांनी पराभव केला.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यतील चारपैकी तीन जागा जिंकून महायुतीने आपले वर्चस्व कायम राखले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागा शिवसेनेने चांगल्या मताधिक्याने जिंकल्या. पालघरची जागा भाजपने आरामात जिंकली. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा फुगा फुटला. भिवंडीत भाजपला अंतर्गत कुरघोड्यांचा फटका बसला व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला. कपिल पाटील यांच्या विरोधात असलेली नाराजी तसेच पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली असहकार्याची भूमिका याचा पाटील यांना फटका बसला.
●आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला हा निकाल फायदेशीर ठरणारा आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईत उद्धव ठाकरे गटाचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे चित्र रंगविले गेले होते.
●अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांनी वर्चस्व प्रस्थापित केले.
●महापालिका जिंकण्याचा निर्धार केलेल्या भाजपला मोठा फटका बसला आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास मुंबईत महायुतीपुढे मोठे आव्हान असेल.