विश्वास पुरोहित, मुंबई
३१ डिसेंबरला रात्री मुंबईतील समुद्र किनारे, हॉटेल्स आणि पबमध्ये तरुणाईची गर्दी झाली असतानाच भायखळाच्या अमान शेख या मुलाने नववर्षाचे स्वागत आणि १८ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. अमान आणि त्याच्या कुटुंबीयांनी मरीन ड्राइव्हवर ड्यूटीवर असलेल्या पोलिसांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. शेख कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत नववर्षात मुंबईकरांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
भायखळा येथे राहणारा अमान शेख हा अंजूमन इस्लाम महाविद्यालयात १२ वीत शिकतो. विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अमानचा वाढदिवस १ जानेवारीरोजी असतो. वाढदिवस आणि नवीन वर्ष हा योगायोग असलेल्या अमानचा वाढदिवस दरवर्षी कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात. पण यंदा अमानसाठी वाढदिवस खास होता. अमानचा हा १८ वा वाढदिवस होता. त्यामुळे यंदा काही तरी वेगळे करायचे, असा विचार शेख कुटुंबीयांनी केला.
३१ डिसेंबररोजी मुंबईकरांना सुरक्षित वातावरणात नववर्षाचे स्वागत करता यावे, यासाठी पोलीस रात्रभर पहारा देतात. अशा पोलिसांसोबतच वाढदिवस साजरा करण्याचे शेख कुटुंबीयांनी ठरवले. यानुसार सोमवारी मध्यरात्री शेख कुटुंब भायखळ्यातून मरीन ड्राइव्हला आले आणि ड्यूटीवर असलेल्या पोलिसांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. अमान आणि त्याच्या कुटुंबीयांनी जपलेल्या या सामाजिक भानचे उपस्थितांनीही कौतुक केले.
पोलीस आपल्यासाठी रात्रभर रस्त्यावर उभे राहून पहारा देतात, त्यांच्यासोबत केक कापून मी पोलिसांचे आभार मानले, असे अमानने सांगितले. केक कापल्यानंतर शेख कुटुंब तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक पोलिसाला केक वाटत होते. त्यामुळे अमानचा हा वाढदिवस उपस्थित पोलिसांसाठीही संस्मरणीय ठरला.